नांदेड : भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून सालाबादाप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज, पं.रघुनंदन पणशीकर, अनुराधा कुबेर, रूचिरा केदार, आदित्य मोडक, अनुपम जोशी, मंगेश बोरगावकर हे सर्व कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.
अवघ्या मराठवाड्यातील संगीत रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात अशा या संगीत महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण यांच्या नियोजनाखाली संपन्न होणार्या कार्यक्रमात यावर्षी २५ फेब्रुवारी (बुधवार) रोजी अनुपम जोशी (सरोद), रूचिरा केदार (शास्त्रीय गायन), पं. रघुनंदन पणशीकर (शास्त्रीय गायन) असे कार्यक्रम होणार आहेत. याच कार्यक्रमात ‘संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार -२०२६’ चे वितरण होणार आहे.
२६ फेब्रुवारी (गुरूवार) रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ०५:३० वाजता आदित्य मोडक (शास्त्रीय गायन), अनुराधा कुबेर (शास्त्रीय गायन) व डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज (व्हायोलिन जुगलबंदी) यांच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे.
२७ फेब्रुवारी (शुक्रवार) हा ‘मराठी भाषा गौरव दिवस’. या दिवशी पहाटे ०६:०० वाजता ‘मराठी पहाट’ हा कार्यक्रम होणार असून यात प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर व संच यांचा ‘माय मराठी, सूर मराठी’ हा आगळावेगळा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम कुसुम सभागृहात होणार आहे.
तीन दिवस चालणार्या या संगीत महोत्सवातील कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणार्या भव्य स्वरमंचावर व कुसुम सभागृह येथे संपन्न होणार आहेत. रसिकांचे भावविश्व समृद्ध करणार्या आणि त्यांच्या उदंड प्रेमाच्या बळावर अवघ्या दोन दशकांत भारतातील अग्रगण्य संगीत महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झालेल्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ.अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी.पी.सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अॅड. उदयराव निंबाळकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समिती सदस्य श्री संजय जोशी, श्री रत्नाकर आपस्तंभ, श्री गिरीश देशमुख, डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.
चौकट : संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणार्या ज्येष्ठ कलावंताला दरवर्षी ‘संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पंडित शारदा सहाय यांचे पट्टशिष्य डॉ. राम बोरगावकर (लातूर) यांना २५ फेब्रुवारी रोजीच्या मुख्य कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.