लातूर - स्पर्धेच्या युगामध्ये भावनिक बदल व सुरक्षितता आणि आत्मभान ठेवून विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवावी. शिक्षण घेत असताना आपल्या जबाबदारीचे भान ठेवून भविष्यातील निर्णय घेतल्यास व्यक्तिमत्त्व चांगले घडेल. असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ ज्योती पाटील यांनी केले.
यावेळी त्या जेएसपीएम संचालित श्री स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज एमआयडीसी लातूर येथे महाविद्यालयीन मुलींसाठी आयोजित “जाणीवांचा प्रवास सक्षम वर्तनाची दिशा” या विषयावरील परिसंवादात बोलत होत्या. यावेळी या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मारुती सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मानसोपचार तज्ज्ञ ज्योती पाटील म्हणाल्या की, तरुणाईने महाविद्यालयीन जीवनामध्ये भावनिक बुध्दिमत्ता, सक्षम वर्तन, आत्मसन्मान, आत्मविश्वास सुरक्षितता आणि वैयक्तिक मर्यादा ठेवून कार्य केल्यास जीवन यशस्वी होते. त्यामुळे महाविद्यालयीन नियमांचे पालन करून वाटचाल करावी. असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे म्हणाले, विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जेएसपीएम संचालित महाविद्यालयामध्ये प्राचार्य व इतर कर्मचारी शिक्षणासाठी जेएसपीएम संचालित कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार्या मुलींची पाल्याप्रमाणे काळजी घेतात. परंतु विद्यार्थीनींनीही शिक्षण घेताना आत्मनिर्भर होऊन शिक्षणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये देदिप्यमान यश मिळवण्याचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी या कार्यक्रमाला उपप्राचार्य संजय अंकुश, उपप्राचार्य मनोज गायकवाड, प्रा.हणमंत बद्दे, प्रा.निवृत्ती गौंडगावे, प्रा.अंजली आकुसकर, प्रा.पुजा जोशी यांच्यासह प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.सुचिता घाडगे यांनी मानले.
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून वाटचाल केल्यास ध्येय गाठणे शक्य
- प्राचार्य मारुती सूर्यवंशी
महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींनी स्वयंशिस्त पाळावी. याबरोबरच आपल्या शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून यशस्वी वाटचाल केल्यानंतर उचित ध्येयही गाठणे शक्य होईल व त्या माध्यमातून आपले आणि आपल्या कुटुंबियाची प्रगती होईल. असे प्रतिपादन जेएसपीएम संचालित श्री स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी केले.