बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/12/2024 4:21 PM

नांदेड :- जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग,  युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लग्न लावू नयेत ते केल्यास काय शिक्षा होवू शकते हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रशांत थोरात,  मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक संतोष शेटकार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पांचगे, डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी. पवार, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे डॉ. अमोल प्रभाकर काळे, युनिसेफ, एसबीसी 3 चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, जिल्हा समन्वयक मोनाली धुर्वे आदींची उपस्थिती होती.

जिल्हृयात बालविवाह होवू नये यासाठी नागरिकांपर्यंत कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती पोहचविणे अत्यंत आवश्यक असून या विषयावर जनजागृती व प्रबोधन करावे. तसेच यावर्षी कन्या दिवसाच्या निमित्ताने शपथ व मुलींचे बालविवाह न करणेबाबत पालकांना पत्र लिहून कळविण्याचे उपक्रम राबवावेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच 18 वर्षाखालील मुला-मुलींचे बाल विवाह होणार नाहीत याबाबत शिक्षकांनी जागृती करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला बाल विकास विभाग नांदेड युनिसेफ आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दृष्टीने मागील 4 महिन्यात केलेल्या कार्यवाहीबाबत व पुढील महिन्यात करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. तसेच शाळेतील मुलांसाठी विद्यार्थी सत्र, पालक जागरुकता सत्र कार्यक्रम असे विविध कार्यक्रम मागील कालवधीत घेण्यात आले याबाबत सादरीकरण करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या