नांदेड : विसावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन येत्या 3 जानेवारी रोजी भोकर येथील आनंदीबाई देशमुख गोरठेकर साहित्य नगरी श्री शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बोरगाव रोड येथे पार पडणार आहे . नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसंवाद साहित्य संमेलनाची मेजवानी भोकरकरांना मिळणार असल्याने नूतन वर्षाचे साहित्य रूपी स्वागत होणार आहे अशी माहिती लोकसंवादचे मुख्य संयोजक दिगंबर कदम आणि देविदास फुलारी यांनी दिली आहे.
श्री यशवंतराव ग्रामविकास प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरी यांच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण मातीत साहित्य संमेलने आयोजित करून वाचन चळवळ श्रीमंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. अत्यंत तळमळीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करणारे जेष्ठ कथाकार , मुख्य संयोजक दिगंबर कदम यांच्या पुढाकारातून यावर्षी भोकर येथे हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी तथा कादंबरीकार प्रा. महेश मोरे यांची यापूर्वीच निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटन खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर स्वागत अध्यक्ष म्हणून लालबहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांची निवड करण्यात आलेली आहे .
एक दिवसीय साहित्य संमेलनात सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी , शोभायात्रा काढण्यात येणार असून साडेदहा वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे . संतोष तळेगावे यांच्या साहित्यातील माणिक मोती , मिलिंद जाधव आणि साहेबराव डोंगरे यांच्या चित्र प्रदर्शन व सेवा समर्पण कार्याचे चित्र प्रदर्शनाचे ही यावेळी मान्यवर उद्घाटन करतील .
सकाळी 11 वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. महेश मोरे आपले अध्यक्ष भाषण रसिक श्रोत्यांपुढे ठेवतील. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून विधान परिषदेचे गटनेते आ. हेमंत भाऊ पाटील, आ.राजेश पवार, भैसा विधानसभा मतदारसंघाचे आ. रामराव पाटील यांच्यासह कैलास देशमुख गोरठेकर , बाळासाहेब रावणगावकर, मारोतराव कवळे गुरुजी , गोविंदराव पाटील सिंधीकर, प्रकाशराव भिलवंडे, नामदेवराव पैलवाड , सुरेश बिल्लेवाड , गोविंद बाबा गौड , गणेश कापसे , डॉ. उत्तम जाधव, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण , संजीव कुलकर्णी, प्रभाकर कानरखेडकर , डॉ. पृथ्वीराज तौर, पांडुरंग देशमुख गोरठेकर , सुधीर गुट्टे ,अशोक कुमार मुंदडा यांच्यासह संमेलनाचे मावळते अध्यक्ष नदिष्टकार मनोज बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन प्रसंगी लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या संवेदना या स्मरणिकेचे ही प्रकाशन करण्यात येणार असून शाहीर दिगू तुमवाड यांच्या वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जीवन चरित्र आणि प्रा. आत्माराम राजे गोरे यांच्या ' गाव पण हरवत चाललंय ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.याच वेळी मान्यवरांचे हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिष्ठितांचा लोकसंवाद राज्यस्तरीय सेवा समर्पण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
आयोजित साहित्य संमेलनाचा साहित्यप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
चौकट
प्रा. भू.द.वाडीकर यांची प्रकट मुलाखत
यशवंत महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा प्रसिद्ध समीक्षक , ज्येष्ठ लेखक प्रा. भू.द.वाडीकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली असून कवी, लेखक, व्याख्याते , समीक्षक देविदास फुलारी हे प्रा. भू.द.वाडीकर यांच्या जीवनातील विविध अंतरंग उलगडणार आहेत.
चौकट
कथाकथनाने भरणार साहित्य संमेलनात रंगत
कथाकार बालाजी पेठेकर खतगावकर यांचे अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता पार पडणाऱ्या कथाकथनात प्रा. स्वाती कान्हेगावकर, राम तरटे , अनुपमा बन , डॉ. वैजनाथ अनमुलवाड , माधव फुलारी, प्रा. धाराशिव शिराळे, शिवकुमार पवार यांचे कथाकथन पार पडणार असून या कथाकथनाने लोकसंवाद साहित्य संमेलनात रंग भरणार आहे .
चौकट
जगन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली फुलणार काव्य मैफिल
ज्येष्ठ कवी, इंजि. जगन शेळके यांचे अध्यक्षतेखाली फुलणाऱ्या काव्य मैफलीत डॉ. वृषाली किन्हारकर , डॉ. भगवान अंजनीकर, संदिपान पवार , लक्ष्मण मलगिलवार , रुचिरा बेटकर, शंकर राठोड , बापू दासरी, दिगंबर कानोले , डॉ. उमा देशमुख ,रोहिणी पांडे, सारिका बकवाड , मंगल फुलारी , रूपाली वागरे, माधव सुकेवाड, नागोराव डोंगरे , जितेंद्र देशमुख, अनुरत्न वाघमारे , राम चव्हाण , एकनाथ डुमणे , पांडुरंग पुठेवाड , सदानंद सपकाळे, हनुमंत चंदनकर आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.