पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि भाजपचे प्रा. मोहन व्हनखंडे यांच्यातील वादाशी मिरजकरांना काही देणं-घेणं नाही. भाजप व कॉंग्रेसचे संभाव्य उमेद्वार असलेल्या या दोघांनी किमान पुढील पाच वर्षात मिरजेसाठी काय ’व्हिजन’ असणार आहे. हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावे, असे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे.
मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी म्हणाले, सुमारे १८ वर्षे मिरज विधानसभा मतदारसंघावर खाडे-व्हनखंडे या दोघांचे नाणं चालत होतं. मिरज शहरासह ग्रामीण भागातील विकास संदर्भात निर्णय हे दोघेच घेत होते. हे सर्वश्रुत आहे. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आजअखेर २१०० कोटींचा निधी आणल्याचा दावा करतात. मात्र, हा निधी कोठे खर्च झाला हे प्रा. मोहन व्हनखंडेच सांगू शकतात.
कार्यवाह जहिर मुजावर म्हणाले, उमेद्वारीच्या विषयांवरून मिरज पॅटर्नच्या नावाखाली माजी नगरसेवकांची चंगळ सुरू आहे. आमदारकीच्या साठमारीत मिरजकरांच्या मुलभूत प्रश्नांवर कोणालाच काही देणं-घेणं नाही. बंद पडत चाललेली मिरज औद्योगिक वसाहत, सुविधाअभावी सलाईनवर असलेली मिरज वैद्यकीय नगरी, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या, प्रलंबित असलेल्या भाजी मंडई, मटण मंडई, जीर्ण झालेली लक्ष्मी मार्केट इमारत, दुरावस्था झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदी विषयांवर कोणी बोलायला तयार नाही. भाजप आणि काँग्रेसचे संभाव्य उमेद्वार सुरेशभाऊ खाडे आणि मोहन व्हनखंडे या दोघांनी पुढील पाच वर्षात मिरज शहरासाठी काय व्हिजन आहे? हे मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन सांगावे. असे आवाहन मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, संतोष जेडगे, सलीम खतीब, राकेश तामगावे, वसीम सय्यद आदी उपस्थित होते.