नांदेड :- महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषि प्रदर्शन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे, शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे. यामध्ये मोठ्यासंख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या खंडोरायाच्या यात्रेनिमित्त कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके, भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावे, प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना 4 हजार, 3 हजार व 2 हजार बक्षिस देण्यात येणार आहे.
यासाठी 80 स्टॉल्सचे नियोजन केले आहे. यामध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, औषधे, ट्रॅक्टर निर्माण, औजारे उत्पादन तसेच महिला बचतगटाचे आरोग्य विभागाचे, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञानकेंद्र, महाबिज, खादीग्रामोद्योग अशा विविध स्टॉल्सचा समावेश असेल. ज्यांना प्रदर्शनादरम्यान आपला स्टॉल्स उभारावयाचा आहे त्यांनी कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी माने यांनी केले आहे.