नांदेड : पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता फळबागांवरील पाण्याचा ताण कमी करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग व्यवस्थापनाच्या अल्प व दीर्घकालीन उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून फळझाडांचे संरक्षण करावे.
*अल्प मुदतीच्या उपाययोजना*
आच्छादनाचा वापर : जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडांमधून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. उपलब्धतेनुसार ८० ते १०० मायक्रॉन जाडीच्या पॉलिथिन फिल्मचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. वाळलेले गवत, लाकडाचा भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे किंवा भाताचे काड यांचा वापर करून फळझाडांच्या ठिबक क्षेत्रात सुमारे ४ ते ६ इंच जाडीचा आच्छादनाचा थर द्यावा. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत होते.
मडका सिंचन : कमी खर्चात पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लहान फळझाडांसाठी ५ ते ६ लिटर आणि मोठ्या झाडांसाठी सुमारे १५ लिटर क्षमतेचे मडके वापरता येते. मडक्याच्या तळाशी छोटे छिद्र करून कापडाची चिंधी बसवावी. मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरून त्यात पाणी भरावे व झाकण ठेवावे. मडक्यातील पाणी हळूहळू जमिनीत पाझरल्याने मुळांच्या परिसरात सातत्याने ओलावा उपलब्ध होतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.
मडका सिंचन करताना आंतरमशागत करताना मडके फुटणार नाही तसेच जनावरांमुळे त्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मडके सछिद्र असणे आवश्यक आहे.
सलाईन बाटल्यांचा वापर : ठिबक सिंचनाप्रमाणे थोडे-थोडे पाणी थेट मुळांच्या परिसरात देण्यासाठी सलाईनच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करता येतो. बाटलीमध्ये पाणी भरून ती झाडाजवळ फांदीच्या आधाराने टांगावी आणि नळी मुळांच्या परिसरात ठेवावी. पाणी योग्य प्रकारे झिरपत आहे की नाही, याची नियमित तपासणी करावी. गढूळ किंवा कचरायुक्त पाणी वापरू नये.
खोडास बोर्डो पेस्टचा लेप : तीव्र उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेच्या काळात मोसंबी तसेच इतर फळझाडांच्या खोडाचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो पेस्टचा लेप उपयुक्त ठरतो. यासाठी १ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना आणि १० लिटर पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून खोडास लेप द्यावा. बोर्डो पेस्ट तयार करताना लोखंडी भांडे वापरू नये.
पानोळा व फळांची संख्या मर्यादित ठेवणे : पानांमधून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार हलकी छाटणी करावी. मोसंबीवरील अतिरिक्त पानसोट (वॉटरशूट) वेळेवर काढून टाकावा. कमी पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात झाडावरील फळांची संख्या मर्यादित ठेवावी. छाटणी करताना धारदार कात्री किंवा सिकेटरचा वापर करावा आणि छाटलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
बाष्परोधकाचा वापर : पानांमधून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलिन बाष्परोधकाची (६०० ते ८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ वेळा करता येते. आवश्यकतेपेक्षा अधिक फवारणी करू नये.
खोडाचे संरक्षण : तीव्र सूर्यप्रकाशामुळे खोडाला इजा होऊ नये तसेच साल तडकण्याची शक्यता कमी करण्यासाठी खोडास गवत किंवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने बांधावा. यामुळे खोडाचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. गवत किंवा बारदाना बांधण्यापूर्वी कीड नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात. फळबागेत धूम्रपान करू नये तसेच गवत, पाचट किंवा कडबा जाळताना विशेष दक्षता घ्यावी.
कलम व रोपांना शेडनेटची सावली : लहान रोपे व कलमांवर शेडनेटची सावली केल्यास पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन कमी पाण्यात रोपांचे संरक्षण करता येते. शेडनेट सुस्थितीत असावे. तापमान नियंत्रणासाठी उपलब्ध सुविधेनुसार शेडनेटचा योग्य वापर करावा.
*दीर्घकालीन उपाययोजना*
ठिबक सिंचनाचा अवलंब : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी फळबागांमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. ठिबकद्वारे आवश्यक तेवढे पाणी थेट सूक्ष्म मुळांच्या परिसरात देता येते. तसेच पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्येही योग्य पद्धतीने देता येतात. त्यामुळे कमी पाण्यात अधिक कार्यक्षम सिंचन करून उत्पादनाची गुणवत्ता टिकविण्यास मदत होते.
ठिबक संचातील ड्रीपरची नियमित तपासणी करावी. दररोज ठिबक संच सुरू करण्याची आवश्यकता नसून जमिनीची वाफसा स्थिती लक्षात घेऊन सिंचन करावे. क्षारयुक्त पाण्याचा वापर ठिबक सिंचनासाठी टाळावा.
*उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक*
दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून फळझाडांवरील ताण कमी करण्यासाठी वरील अल्प व दीर्घकालीन उपाययोजनांचा अवलंब करावा. फळबागांचे संरक्षण, पाण्याची बचत आणि भविष्यातील उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी ठिबक सिंचन, आच्छादन आणि योग्य पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.