*माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी व गाणगापूर रोड येथे १४ ऑक्टोबरपासून थांबा*
*मंगळवार व शुक्रवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार*
*रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या पाठपुराव्याला यश*
मिरज, दि. १३ ऑक्टोबर : कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर विशेष गाडी क्रमांक ०१४५१/०१४५२ ला प्रवाशांच्या मागणीनुसार अखेर माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड या पाच महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन तसेच रेल्वे प्रादेशिक सल्लागार समिती सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार हे अतिरिक्त थांबे १४ ऑक्टोबर २०२६ पासून १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत गाडी मंगळवार व शुक्रवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार असून एकूण २४ फेऱ्या होणार आहेत.
मंजूर थांब्यांचे वेळापत्रक
स्थानक ०१४५१ कोल्हापूर–कलबुर्गी ०१४५२ कलबुर्गी–कोल्हापूर
माढा - आगमन १३:४३ / प्रस्थान १३:४४ आगमन २१:१९ / प्रस्थान २१:२०
मोहोळ - आगमन १४:०५ / प्रस्थान १४:०६ आगमन २०:५९ / प्रस्थान २१:००
सोलापूर आगमन १४:३० / प्रस्थान १४:३५ आगमन २०:२५ / प्रस्थान २०:३०
अक्कलकोट रोड - आगमन १५:०५ / प्रस्थान १५:०६ आगमन १९:०४ / प्रस्थान १९:०५
दुधनी - आगमन १५:२४ / प्रस्थान १५:२५ आगमन १८:५९ / प्रस्थान १८:५०
गाणगापूर रोड - आगमन १५:४० / प्रस्थान १५:४१ आगमन १८:२९ / प्रस्थान १८:३०
रेल्वे प्रशासनाच्या सुधारित निर्णयानुसार यापूर्वी ही विशेष गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात येणार होती. मात्र आता मंगळवार आणि शुक्रवार वगळता पाच दिवस ही सेवा चालविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या नव्या थांब्यांमुळे माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड परिसरातील प्रवाशांना कोल्हापूर, मिरज तसेच कलबुर्गीला थेट रेल्वेसेवेचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, भाविक आणि सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
कोल्हापूर–मिरज–कलबुर्गी मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या गाडीला अधिकाधिक ठिकाणी थांबे मिळावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन आणि मध्य रेल्वे प्रादेशिक सल्लागार समिती सदस्यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने पाच महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
“प्रवाशांच्या मागणीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश असून, कोल्हापूर–मिरज–कलबुर्गी मार्गावरील प्रवाशांना या निर्णयाचा मोठा लाभ होईल,” अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी व्यक्त केली.