नांदेड : नागरिकांना कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित शासकीय योजनांची माहिती सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी दि. 10 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत नांदेड तालुक्यातील 4 आणि अर्धापूर तालुक्यातील 3 महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा संबंधित महसूल मंडळातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
नांदेड तालुक्यात दि. 10 सप्टेंबर रोजी लिंबगाव व नाळेश्वर, 11 सप्टेंबर रोजी विष्णुपुरी व तुप्पा, 15 सप्टेंबर रोजी वसरणी व वाजेगाव तसेच 16 सप्टेंबर रोजी नांदेड शहर, नांदेड ग्रामीण व तरोडा (बु.) महसूल मंडळात शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. अर्धापूर तालुक्यात दि. 11 सप्टेंबर रोजी अर्धापूर येथील मंडळ/ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात, 15 सप्टेंबर रोजी दाभड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आणि 16 सप्टेंबर रोजी मालेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.
या विशेष मोहिमेत संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, गावातील जुने महसुली व इतर शासकीय अभिलेखांमधून कुणबी नोंदी शोधणे, अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यांची जागेवरच पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारून विहित कायदेशीर प्रक्रिया राबविणे तसेच पात्र लाभार्थ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जलद कार्यवाही करण्यात येणार आहे. शिबिराची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत नोटीस बोर्ड, दवंडी तसेच स्थानिक समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात येत आहे.
शासनाच्या या विशेष मोहिमेत संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.