आजच्या धावपळीच्या युगात, आपण सर्वजण वेळेच्या एका कठोर चौकटीत अडकलेले आहोत. प्रत्येकालाच कुठे तरी पोहोचायचं आहे, काही तरी साध्य करायचं आहे. अशा वेळी रस्त्याने प्रवास करताना जर कुठे एखादा अपघात झालेला दिसला, तर बऱ्याच वेळा आपण केवळ पाहतो आणि पुढे निघून जातो. अपघातग्रस्त व्यक्ती मदतीसाठी हाका मारत असते, रक्ताच्या थारोळ्यात असते, श्वासोच्छ्वासासाठी धडपडत असते… पण आपण मात्र आपल्या "घाईच्या" कारणावर ठाम राहून मदत करण्याचे टाळतो. खरं पाहिलं तर ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि समाजासाठी चिंताजनक आहे.
कारण आपल्या देशात अपघाताचे भयावह वास्तव आहे,भारतात दरवर्षी लाखो अपघात होतात. सरकारी आकडेवारीनुसार दर तासाला किमान १५ ते २० अपघात होतात, आणि त्यात अनेकजण आपला जीव गमावतात. यामध्ये बऱ्याच वेळा वेळेत मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्ताचा मृत्यू देखील होतो. "गोल्डन अवर" नावाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात ओळखली जाते, अपघात झाल्यानंतरचा पहिला एक तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जर अपघातग्रस्ताला तात्काळ प्राथमिक उपचार आणि रुग्णालयात दाखल केले गेले, तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. पण अनेक वेळा याच काळात मदत मिळत नाही आणि निष्पापास प्राण गमवावे लागतात.ही आजही समाजातील मोठी उदासीनता दिसून येते, जेव्हा आपण रस्त्यावर एखादा अपघात पाहतो, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते — "हे माझं काम नाही", "मला उशीर होईल", "पोलीस त्रास देतील", "आपण का अडकायचं?". ही मानसिकता आजच्या समाजात खोलवर रुजलेली आहे. काही लोकं तर फक्त मोबाईल काढून व्हिडीओ काढतात, समाजमाध्यमांवर टाकतात, पण प्रत्यक्ष मदतीसाठी पाऊल पुढे टाकत नाहीत. हा स्वार्थी आणि बिनधास्त दृष्टिकोन समाजाला एका गंभीर अधःपतनाच्या दिशेने घेऊन जातो. मात्र अपघातसमयी मदतीसाठी पुढे येणारे काही देवदूतही असतात,सुदैवाने, काही लोकं अशाही काळात माणुसकी जपत मदतीसाठी पुढे येतात. हे लोक खरंच देवदूतच असतात. पोलिस, आरटीओ अधिकारी, रिक्षाचालक, रस्त्यावरील दुकानदार, अगदी सामान्य नागरिकही अनेकदा अपघात पाहताच मदतीसाठी धाव घेतात, रुग्णवाहिका बोलावतात, प्राथमिक उपचार करतात, अपघातग्रस्ताला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात. अशा व्यक्तींनी अनेक वेळा अनेकांचे प्राण वाचवले आहेत. शिवाय अपघातसमयी मदत करणाऱ्या अशा मदतगारांना
घाबरण्याचे आता कारणही नाही याउलट त्यांना कायद्याने संरक्षण देखील आहे. पूर्वी लोक अपघातग्रस्तांना मदत करायला घाबरत असत कारण त्यांना पोलिसांचा त्रास होईल अशी भीती वाटायची. परंतु सन २०१६ पासून भारत सरकारने "गुड समरिटन लॉ" लागू केला. यानुसार, जो कोणी एखाद्या अपघातग्रस्ताला मदत करतो, त्याला कोणताही कायदेशीर त्रास दिला जाऊ शकत नाही. त्याला आपली ओळखही उघड करायची गरज नसते. अशा मदत करणाऱ्याला सरकारकडून प्रोत्साहन दिलं जातं. तरीही अनेक लोकांना या कायद्याची माहिती नसल्यामुळे ते मदतीपासून मागे राहतात.
मात्र अपघातग्रस्तांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, अपघातग्रस्ताला मदत करणे ही फक्त कायदेशीर किंवा सामाजिक जबाबदारी नसून ती एक नैतिक जबाबदारीही आहे. आज ज्याला मदतीची गरज आहे, तो उद्या आपणही असू शकतो. आपण जर आज मदत केली, तर भविष्यात आपल्यालाही कुणीतरी मदत करेल. "जेव्हाही शक्य होईल तेव्हा मदतीचा हात पुढे करा", ही शिकवण प्रत्येकाने मनात रुजवली पाहिजे.तथा अपघात प्रसंगी तात्काळ काय करावे?
जर रस्त्यावर एखादा अपघात झाला असेल आणि आपण ते पाहिले, तर खालील गोष्टी तात्काळ कराव्यात. १)सुरक्षिततेची खात्री करा, आपले आणि अपघातग्रस्ताचे संरक्षण महत्त्वाचे आहे.२) रुग्णाची अवस्था पाहा, तो शुद्धीत आहे का, श्वास घेतोय का हे तपासा. ३) तात्काळ १०८ वर कॉल करा, आपत्कालीन (रुग्णवाहिका) सेवेला तत्काळ फोन करा.४) प्राथमिक उपचार करा, आपणास माहिती असल्यास, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्राथमिक उपचार करा.५) अपघातग्रस्तांचे मनोबल वाढवा,रुग्णाशी बोलून त्याचे मनोबल वाढवा. ६) रुग्णवाहिका येईपर्यंत सोबत रहा,रुग्णाला एकटं सोडू नका. ७) पोलीस मदतीसाठी संपर्क करा,अपघाताची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्या. यामुळे त्या अपघातग्रस्तांना मोठा आधार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यास आपली मोठी मदत मिळेल.
*सामाजिक जागृतीची गरज*
आज समाजात अपघातांबाबत जागृती निर्माण करण्याची नितांत गरज आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, नागरिक मंडळे यांच्यामार्फत जनजागृती केली पाहिजे. "रस्ता सुरक्षा सप्ताह", "प्राथमिक उपचार कार्यशाळा", "गुड समरिटन कायद्याविषयी मार्गदर्शन" असे उपक्रम राबवून जनतेमध्ये सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्र आणी राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आरटीओ व पोलिस अधिकारी यांचे द्वारे विविध शाळा,विद्यालय, महाविद्यालय,आणी चौकाचौकांमध्ये वाहतूक नियमांच्या जनजागृतीपर अपघातांविषयक तथा वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते,परंतु जनसामान्यांचा त्यास अत्यल्प प्रतिसाद लाभतो ही शोकांतिका आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमांना केवळ वाहन चालकच नव्हेतर रस्त्यावर पायी चालणारे पादचारी आणी लहानपासून थोरांपर्यंत सर्वांनीच आवर्जून उपस्थिती दर्शविली पाहिजे.
काही प्रसंगसिद्ध उदाहरणे असेही आहेत की,काही घटनांमधून हे ठळकपणे दिसते की एका सामान्य नागरिकाच्या तात्काळ कृतीमुळे एखाद्याचा जीव वाचतो. पुण्यात एकदा एक तरुण दुचाकीवरून जाताना अपघात झाला आणि तो रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला. एक रिक्षाचालक तिथे आला, त्याने कोणताही विचार न करता त्या तरुणाला रुग्णालयात नेले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला. खरे तर हे रिक्षाचालक समाजाचे खरे हिरो आहेत.
*अपघात रोखण्यासाठी* *आपण काय करू शकतो?*
१) वाहन चालवताना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे, वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे,सिग्नल तोडू नये, हेल्मेट/सीट बेल्टचा वापरा करावा,२) शिस्तीत वाहन चालवा, वेगमर्यादा पाळा, मोबाईलचावापर टाळावा, ३) वाहनाची स्थिती तपासा,ब्रेक, टायर, लाईट्स यांची वेळोवेळी तपासणी करा.,४) रस्ता सुरक्षिततेबाबत इतरांना जागरूक करा.झोप येत असेल अथवा थकवा जाणवण असेल तर वाहन चालवू नये, योग्य आणी सुरक्षित जागा बघून थोडीशी विश्रांती घ्यावी,मगच वाहन चालवावे,वाहन चालवताना नेहमी स्वतःचा बचाव यासोबतच समोरच्याचा देखील बचाव करणे तीतकेच महत्त्वाचे असते.
"माणुसकी हाच खरा धर्म आहे" ही आपली भारतीय संस्कृती शिकवते. एखादा अपघातग्रस्त रस्त्यावर मदतीसाठी धडपडतो आणि आपण फक्त पाहत पुढे जातो, तर आपण एका माणसाला वाचवण्याची संधी गमावतो. आपले काही मिनिटे थांबणे, एक फोन करणे किंवा रुग्णवाहिकेची मदत मिळवून देणे,एवढंच केल्याने एखादा जीव वाचू शकतो.म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा आपण रस्त्यावर एखादा अपघात पाहू, तेव्हा ‘मी का मदत करावी?’ असं न विचारता, ‘जर मी नाही मदत केली तर कोण करेल?’ असा विचार करूया. समाजात आपले योगदान हे अशा छोट्या पण प्रभावी कृतींमधूनच घडते.एकटे आपण संपूर्ण जग बदलू शकत नाही, पण कुणाच्यातरी संपूर्ण जगासाठी आपण फरक नक्कीच घडवू शकतो.
*शब्दांकन: शौकतभाई शेख*
संस्थापक: समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
भ्रमणध्वनी: ९५६११७४१११