◆कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या पूर्वत सुरू करण्याचीही मागणी
___________________
कोल्हापूर, बेळगाव, हुबळी रेल्वे स्थानकांचा विकास झाला. मात्र, मिरज रेल्वे जंक्शनच्या मॉडेल स्टेशनची घोषणा होऊन सुद्धा मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित आहे. म्हणून मिरज जंक्शनच्या विकास आणि कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे मिरज रेल्वे जंक्शन आहे. अनेक वेळा मॉडेल स्टेशनची घोषणा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. शिवाय, कोरोना काळात मिरज जंक्शनवरून सुटणाऱ्या मिरज - बेल्लारी लिंक एक्सप्रेस, सोलापूर - कोल्हापूर, मिरज - बेळगाव पॅसेंजरसह अनेक रेल्वे गाड्या बंद केल्या.मात्र, त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. म्हणून यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे आणि रेल्वे बोर्ड अध्यक्षसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिले. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, रामलिंग गुगरी, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद,शब्बीर बेंगलोरे, संतोष जेडगे, असिफ निपाणीकर, अभिजीत दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते.