. ..हे आहेत श्री. गोपाळ पाटील. सर्व श्रमिक संघाचे ज्येष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष. खासगी आणि निम शासकीय 185 आस्थापनांमध्ये काम करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन रू. 9000 + महागाई भत्ता अशी मिळावी, वैद्यकीय मदत, प्रवास सवलत यासाठी 2014 पासून ते आणि त्यांची संघटना लढत आहे. ( आज 800 ते 1000 आणि 2014 नंतर निवृत्त काही निवृत्तांना यांच्या संघटनेच्या लढ्यामुळे 3300 ते 4500 रुपये दरमहा पेन्शन मिळते.) भारतातील 75 लाख श्रमिकांच्या निधीवर सरकार त्याच्या व्याजाइतकेही निवृत्ती वेतन देत नाही. आठ लाख कोटी संचित रक्कम आणि त्यावर वार्षिक व्याज 51 ते 52 हजार कोटी केंद्राला मिळते. त्यातील ते फक्त 25 टक्के पेन्शनसाठी वाटप करतात. आज सत्तेत असणाऱ्या पक्षाचे नेते तत्कालीन खासदार भगतसिंह कोषारी विरोधात असताना त्यांच्याच समितीने केंद्राला 3000 रू. + महागाई भत्ता इतक्या पेन्शनची शिफारस केली होती. सत्तेवर येताच त्यांच्या पक्षाला याचे विस्मरण झाले. जावडेकर म्हणाले होते, आमचे सरकार येताच 90 दिवसात ही पेन्शन लागू करू आणि ती महागाई प्रमाणे वाढत जाईल. काँग्रेस काळातही गोपाळ पाटील आणि त्यांचे देशभरात असलेले सहकारी लढत होते. ते आजही लढत आहेत. आता माझ्या समोर ते माहिती पत्रक घेऊनच बसलेत. त्यांना विचारलं कशाला इतके दमता? सरकार ऐकणार आहे काय? तुम्हाला लाभ मिळणार आहे काय?
ते म्हणाले,
आम्हाला नाही मिळणार, ठीक आहे! पण, उद्या तुमच्या पिढीला ते नक्की मिळेल!! त्यांना द्यावे लागेल. उद्याच्या त्या निवृत्त कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आजचे निवृत्त कामगार झटतोय... हा देश कामगार आपल्या रक्त आणि घामाने चालवतो. त्याची किंमत समाज आणि सरकारने ठेवली पाहिजे. त्याला अखेरपर्यंत सन्मान आणि स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. तो तुमची मेहेरबानी मागत नाही. त्याच्या हक्काचे पैसे तुमच्या तिजोरीत व्याज रूपाने वर्षानुवर्षे पडून आहेत. तेवढेच द्यायचे आहेत. तुमच्या खिशातून नाही. कुठल्या तरी सरकारला आमच्या या मागण्या मान्य कराव्या लागतील. आम्ही थोडे, थोडे यशस्वी होत असतो. त्यामुळे थकत नाही... आम्ही उद्याच्या कामगारांसाठी झटतो असे समजा... आमच्या शक्तीमुळे, आंदोलनामुळे ते तरी चांगले आयुष्य जगतील.....