*दुष्काळाकडून जल समृद्धीकडे किरकसाल गावची वाटचाल*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 17/01/2025 10:24 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

गोंदवले दि:माणदेशातील किरकसाल गाव दुष्काळी म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हया अडचणींना वेळोवेळी प्रकर्षाने सामोरे जावे लागत होते. सन 2002 साली पडलेल्या दुष्काळामध्ये गावाला पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात होते. ते पाणी पुरेसे होत नव्हते. जनावरांची चारा छावणी उभी करण्यात आली होती. त्यामुळे बराचसा वेळ गावापासून 1 ते 2 किमी अंतरावर जावून पिण्याचे पाणी जमा करणे. जनावरांची चारा छावणीवर थांबणे ही कामे शालेय विद्यार्थी व महिलांना करावी लागत होती. पुरुष मंडळी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होती.  पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गावकऱ्यांची वणवण, जनावरांच्या चाऱ्‍यांचा प्रश्न याची कुठेतरी सल मनाला लागून राहायची. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत गावाला स्वयंपूर्ण करण्याचा गावकऱ्यांच्या सहकार्याने निर्धार केला. आज हे गाव टँकर मुक्त झाले तर आहेत पाण्याच्याबाबतही स्वयंपूर्ण झाले आहे. माण तालुक्यातील किरकसाल या दुष्काळकडून जलसमृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या गावाची ही यशोगाथा
किरकसालचे सरपंच आमेल काटकर व त्यांचे सहकारी यांनी  जलसंधारणाच्या सरकारी योजनांची माहिती घेण्याच्या कामाला सुरूवात केली. माहिती घेत असताना कृषी विभागाच्या पद्मश्री पोपटराव पवार   मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या आदर्श गाव योजनेत गावच्या समावेशासाठी गावात पोपटराव पवार व डॉ. अविनाश पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्यानंतर   सरकारी अधिकारी व गावकऱ्यांच्या समवेत शिवार फेरी करून शेती, पिके, विहीरी, बोअरवेल, जलसंधारणाचे जुने उपचार, नवीन करावयाचे उपचार इत्यादी माहिती संकलित करणेत आली. गावचे एकूण क्षेत्रफळ 1802.64 हे.असून त्यापैकी सुमारे 35 टक्के म्हणजे 616 हे.क्षेत्र हे.डोंगर उताराचे आहे.त्यामुळे गावामध्ये व गाव शिवारामध्ये श्रमदान, लोटाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, बोअरवेलबंदी, नशाबंदी, नसबंदी या सप्तसुत्रीवर काम सुरु करणेत आले. 
आदर्श गाव योजना निधीतून माती नाला बांध, 250 हे.डीप सी.सी.टी., 6 एल.बी.एस. 150 हे कंपार्टमेंट बंडींग इत्यादी जलसंधारण उपचार आणि गावकऱ्‍यांचे श्रमदान या माध्यमातून 7.50 को.लि. (Ham) पाणी आडविण्यात आले. याबरोबरच गाव शिवारामध्ये वणवा लागू न देणे आणि चुकून लागल्यास तो विझवण्यासाठी गावकरी अपार कष्ट घेतले. त्यानंतर पुढे जलयुक्त शिवार योजना, पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या माध्यमातून सन 2017 मध्ये काम करण्यात आली. यामध्ये संपुर्ण गावकरी अगदी 5 वर्षापासूनच्या लहान मुलापासून ते 85 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या कामामध्ये सहभागी होते.यावेळी जलसाक्षरतेची कार्यशाळा घेण्यात आली या माध्यमातून गावातील 93 युवक, महिला,ग्रामस्थ जलसाक्षर झाले. यातील सगळयात अवघड काम डंम्पी लेवलच्या सहाय्याने कंटूर आखणे, मोजमाप घेणे ही कामे महाविद्यालीन युवक –युवती यांनी केली. 
पाणी अडविण्याच्या या श्रमदानाच्या महायज्ञात गावकरी   तन-मन-धनाने काम करीत होते. गावच्या ग्रामस्थांनी ग्रामदैवतांच्या यात्रेतील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करून सुमारे 1 लाख रू., ग्रामस्थांची देणगी 3 लाख, सी.एस.आर. व इतर निधी 6लाख असे एकूण 10 लाख रू. व शासनाचे सहकार्य या माध्यमातून कंटूर बंडींग, डीप.सी.सी.टी., कंपार्टमेंट बंडींग, एल.बी.एस,शेततळी, नाला खोलीकरण-रूंदीकरण इत्यादी जलसंधारणाचे उपचार करणेत आले. या माध्यमातून 31.37 को.लि.पाणी गावच्या शिवारात   थांबविण्यात यशस्वी झाले. 
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तलाव दुरूस्ती, गाळ उपसा, ओढयाचे खोलीकरण व रुंदीकरण, 5 सिमेंट बंधाऱ्याचे काम करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून    सुरु झालेली अटल भूजल योजना आमच्या दृष्टीने जलसंधारण कामातील मैलाचा दगड(Milestone) ठरली. या योजनेमुळे शास्त्रीयदृष्टया काम दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करणे या बाबीवर विशेष लक्ष देणेतआले. या योजनेच्या माध्यमातून व  सी.एस.आर.निधीतून रिचार्ज शाफ्ट, डीप सी.सी.टी., कंपार्टमेंट बंडींग, ड्रीप, मल्चिंग, स्पिंक्लर इत्यादी जलसंधारणाचे उपचार व पाणी बचतीच्या उपाययोजना करणेत आल्या. तसेच वृक्ष लागवड यामध्ये आंबा, चिंच, जांभुळ, करवंद,सिताफळ, कडूनिंब, वड इत्यादी वृक्ष लागवडीवर भर देण्यात आला. वेळोवेळी गावात जलसाक्षरतेची कार्यशाळा आयोजित केली गेली. 
गावच्या परिसरात 4 ठिकाणी पर्जन्यमापक, पीझोमीटर,वॉटर फ्लोमीटर, पाणी पातळी मोजण्यासाठी वॉटर इंडिकेटर याचा वापर केला जातो. यामाध्यमातून गावातील पाण्याचा अचूक डेटा शालेय विद्यार्थी गोळा करतात. गावचा डब्ल्यू एस.पी.(वॉटर सिक्युरिटी) प्लॅन तयार केला. गावच्या पाण्याचा ताळेबंद मांडणे व त्यानुसार पीक पद्धतीत बदल याचा अवलंब करण्यास गावकऱ्यांनी सुरूवात केली आहे. आज   गावच्या  पाण्याच्या ताळेबंदाचा विचार करता फक्त 8.63 कोटी लिटर इतक्या तुटीचे अंदाजपत्रक आहे.  किरकसाल गाव लवकरच वॉटर न्युट्रल होणेच्या मार्गावर आहे. अटल भूजल योजना जलसंधारण कामामुळे गावचे मनसंधारण करण्यात   गावकरी यशस्वी झाले. 



महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाचे  आयुक्त भालचंद्र चव्हाण व  सहसंचालक प्रवीण कथने तसेच सातारा जिल्हयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे मोलाचे सहकार्याबरोबर मार्गदर्शन केले.    ज्या ठिकाणी शेतीचा रब्बी हंगाम पार पडत नव्हतो त्या ठिकाणी अटल भूजल योजनेतील जलसंधारणाच्या कामामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडले. गावात सन 2012 पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आणि चारा छावणीची मागणी करणेची आवश्यकता लागली नाही. गावामध्ये रिव्हर्स मायग्रेशन सुरु झाले आहे. आजपर्यंत गावातील मुंबई पुणे येथे स्थलांतरित झालेले गावातील युवक व ग्रामस्थ   परत गावात आली आहेत. 
गावातील शेतीमध्ये द्राक्ष, आंबा, खजूर, कलिंगड, डाळिंब इत्यादी फळपिके भेंडी,शिमला मिर्ची, मिर्ची, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, वाटाणा, मेथी,वांगी इ. भाजीपाला, झेंडुसारखी फुलपिके असे आधुनिक शेतीचे प्रयोग गावातील शेतकरी करू लागले आहेत. शेळीपालन,कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय हा गावातील शेतकरी व युवकांचा शेती बरोबरचा जोड व्यवसाय आहे.   दररोज गावातून अंदाजे 4 हजार 750 लिटर दूध उत्पादित केले जाते जे पुर्वी 1000 लिटर एवढे दररोज उत्पादन होते. किरकसालच्या गावच्या कामाची दखल केंद्र शासनाने घेतली असून अमोल काटकर यांना 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडसाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे.
     माण तालुक्यातील किरकसाल गाव टँकरमुक्त झाले असून पाण्याच्याबाबती स्वयंपूर्ण झाले आहे. या गावातील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करुन कृषी उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेत आहेत. या गावाचा आदर्श इतर गावांनी घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याच्याबाबती गावे स्वयंपूर्ण करावीत.

    

Share

Other News

ताज्या बातम्या