नांदेड : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ७ कलमी कार्यक्रमाच्या 'मिशन 100 डे ' अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 7 जानेवारी रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील सात सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.
७ कलमी कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे
१. *वेबसाईट अद्यावत करणे:* जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटचा दर्जा सुधारून ती माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना ऑनलाइन सुविधांचा जलद लाभ घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. ज्या कार्यालयांच्या वेबसाईट आहेत त्या सर्व अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
२. *इज ऑफ लिविंग वाढविणे:*
नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी, विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्याचे आणि समस्यांवर सोयीस्कर उपाययोजना हाती घेतल्या जातील.
३. *कार्यालयीन स्वच्छता:*
सुंदर माझे कार्यालय या शासन निर्णयाप्रमाणे प्रशासनातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाईल.
४. *तक्रार निवारण:*
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर केला जाईल. विशेषता यासाठी आपले सरकार पोर्टल, सीपी ग्राम व पीजी पोर्टल व इतर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
५. *सोयीसुविधा वाढविणे:*
नागरी सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे कार्यालयातील स्वच्छतागृहे अद्यावत ठेवणे कार्यालयामध्ये अभ्यास कक्ष निर्माण करणे कार्यालय परिसराचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे
६. *गुंतवणूक प्रोत्साहन:*
जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी विशेष धोरणे आखली जातील. तातडीने सर्व परवाने संबंधितांना उपलब्ध होतील कुठेही अडवणूक होणार नाही याबाबत दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.
७. *क्षेत्रीय भेटी वाढविणे:*
अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावे तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याची निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहे.
*वेळापत्रक आणि प्रगती आढावा*
या कार्यक्रमाची सर्व अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, ५० दिवसांनंतर या प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर दिवसाच्या कालमर्यादेत परिपूर्णतेचे आदेश दिले आहेत.