नांदेड : चर्मकार समाजाला कर्ज रकमेचे तात्काळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता लिडकाॅमच्या जिल्हा कार्यालयासमोर नांदेड येथे भव्य आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
येथील संत रविदास चर्मकार व चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाच्या (लिडकाॅम) नांदेड जिल्हा कार्यालयात चर्मकार समाजाच्या कर्जाच्या असंख्य फाईली प्रलंबित आहेत. ज्यांना मंजूरी मिळाली त्यांनी लाभार्थी सहभाग भरुन अनेक महिने झाले तरीही कर्ज रक्कम वाटप करण्यात आली नाही. याबाबत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने व्यवस्थापकीय संचालकांना मुंबई येथे निवेदन देऊन तात्काळ कर्ज वितरण करण्याची मागणी केली.
परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे समवेत मुंबई येथे निवेदन देतांना नारायण अन्नपुरे, दादाराव वाघमारे, श्रीनिवास कांबळे, सुरेश वाघमारे, संतोष सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. प्रलंबित कर्ज प्रकरणी तात्काळ कार्यवाही नाही झाल्यास तीव्र स्वरुपाची आंदोलने करण्यात येतील असा ईशारा यावेळी लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला.
नांदेडच्या जिल्हा कार्यालयात जवळपास २७ जणांनी लाभार्थी सहभागाची रक्कम भरली. यास अनेक महिन्यांचा कालावधी होऊनही लाभार्थांना कर्जाच्या रकमेचे वाटप करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. येत्या ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सर्व २७ लाभार्थांना जर कर्ज रकमेचे वाटप नाही केले तर जिल्हा कार्यालयाच्या समोर सामाजिक न्याय भवन, हिंगोली रोड, नांदेड येथे अ. भा. गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यास सर्व लाभार्थी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.