मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करण यादव उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत. 2024 मध्ये सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा तिसरा सांगली दौरा आहे ही समाधानाची बाबत असली तरी सांगली स्टेशनचे प्रश्न सुटले नाहीत.
श्री यादव प्रवाशांच्या खालील अशा आकांक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे
1) *सांगली स्टेशनवर रिटायरिंग रूम मंजूर करावे*
बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना रास्त दरात राहण्यासाठी देशात 550 स्टेशन वर रिटायरिंग रूम आहेत यातील 400 रेल्वे स्टेशन सांगली पेक्षा लहान आहेत. सांगली जागतिक हळदी बाजारपेठ देशातील मोठी गुळ बेदाणा बाजारपेठ व पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक औद्योगिक शहर असून सांगली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम मंजूर करावे
3) *सांगली स्टेशनवर प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी क्लॉक रूम मंजूर करावा*
बाहेरगावहून आलेल्या व्यापाऱ्यांना व प्रवाशांना अल्प भाडे देऊन स्वतःचे सामान सुरक्षितपणे स्टेशनवर ठेवून सांगली शहरात स्वतःचे काम आटपून परत दुसरी गाडी पकडता यावी यासाठी स्टेशनवर क्लॉक रूम मंजूर करावा देशात 600 स्टेशनवर क्लॉक करून सुविधा आहे पण फक्त सांगलीतच नाही.
3) *सांगली स्टेशनवर प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची मूलभूत सुविधा मंजूर करावी*
सांगली स्टेशनवरून नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करता याव्या कोट्यावधी रुपये खर्चून प्लॅटफॉर्म 5 बांधण्यात आले. पण सांगली स्टेशनवर प्रवासी गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा नसल्याने नवीन गाड्या सुरू करण्यास अडथळा येतो वास्तविक रुपये 5000 कोटी खर्चून पुणे सांगली लोंढा रेल्वे मार्गाचे दुपत्रीकरण करण्यात आले त्यामध्ये सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा प्रस्तावित होती पण ती करण्यात आलेली नाही त्यामुळे ती आता मंजूर करावी
4) *सांगली स्टेशनच्या पूर्व दिशेला प्रवेशद्वार किंवा पादचारी फुल मंजूर करावा*
सांगली शहराच्या कुपवाड एमआयडीसी सावळी बामनोली यशवंतनगर संजयनगर अभय नगर सह्याद्रीनगर विश्रामबाग इत्यादी परिसरातून रेल्वे स्टेशन येण्यासाठी पूर्व दिशेला प्रवेशद्वार किंवा पाचारी फुल त्वरित मंजूर करावा
5) *सांगली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकच्या पुणे दिशेतून रस्त्यावर उतरण्यासाठी जिना मंजूर करावा*
सांगली स्टेशन प्लॅटफॉर्म 1च्या रेल्वे पुलाच्याखाली रस्त्यावर एसटी बस थांबा मंजूर झाला आहे. या एसटी थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म 1 वर चढण्यासाठी रेल्वे पुलाच्या पुणे बाजूने जिना टाकण्यात यावा
6) *सांगली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर पाच वर जाण्यासाठी पादचारी पुल लवकर बांधण्यात यावा*
7) *सांगली स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 5 वर कोच इंडिकेटर व अनाउन्समेंट सिस्टीम बसवण्यात यावे*
8) *माधवनगर येथे सुसज्ज मोठा गुड्स टर्मिनल उभारण्यात यावा*
सांगली स्टेशन वरील माल धक्क्याची क्षमता कमी असून सांगली जिल्ह्यातून कृषी माल व इतर औद्योगिक माल पाठवण्यासाठी व बाहेरून सांगलीत माल मागवण्यासाठी माधवनगर रेल्वे स्टेशन येथे एक सुसज्ज रेल्वे गुड्स टर्मिनल (माल धक्का) उभारण्यात यावा
*नवीन गाड्यांची मागणी*
गाडी क्र 01543/01544 कोल्हापूर-मिरज डेमू चा विस्तार किर्लोस्करवाडी पर्यंत करावा. या गाडीचा विस्तार करण्यासाठी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर कोणत्याही टर्मिनल सुविधेची आवश्यकता नसल्याने ही गाडी लवकरात लवकर किर्लोस्करवाडी स्टेशन पर्यंत विस्तारित होऊ शकते
2) सांगली-मेंगलोर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस वाया हुबळी आर्सीकेरी हसन मार्गे लवकर सुरू करावी
3) सांगली-विशाखापटनम एक्सप्रेस वाया सोलापूर हैदराबाद निजामाबाद विजयवाडा मार्गे सुरू करावी
4) मुंबई-पंढरपूर एक्सप्रेस वाया सातारा सांगली मिरज मार्गे सुरु करावी. महाराष्ट्र शासनाने देखील मध्य रेल्वे व रेल मंत्रालयाकडे मुंबई-सांगली-पंढरपूर मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.
5) देशात सर्वत्र वंदे भारत, राजधानी, तेजस, शताब्दी, जनशताब्दी दुरंतोसारख्या गाड्या सुरू झाल्या. पण सांगली रेल्वे स्टेशनला अशा प्रकारची एकही रेल्वेगाडी मिळाली नाही यावर रामकरण यादव यांनी विचार करावा. कोल्हापूर-सांगली-मुंबई, पंढरपूर-सांगली-मुंबई व मिरज-सांगली-सरत-वडोदरा वंदे भारत गाड्या सुरू कराव्या
6) सांगली रेल्वे स्टेशन वरून जामनगर भावनगर अमृतसर चेन्नई लखनऊ पटना इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्या
7) गाडी 11027/11028 दादर-सातारा एक्सप्रेस वाया सांगली आठवड्यातून 3 दिवस धावते. ही गाडी रोज दैनंदीन करावी
8) गाडी क्र 01545/01546 मिरज-कुर्डूवाडी डेमू गाडी सांगली स्टेशन पर्यंत विस्तार करावी. सांगली शहरातील प्रवाशांना पहाटे 5 वाजता ही गाडी पकडण्यासाठी मिरज जाणे अतिशय त्रासदायक आहे.
*पुढील थांबे प्रलंबित आहेत*
1) गाडी क्र 20475/20476 मिरज बिकानेर एक्सप्रेस गाडीला सांगली व किर्लोस्करवाडी येथे थांबा सुरू करावा
2) गाडी 22685/22686 यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांती व गाडी 12629/12630 यशवंतपुर-निजामुद्दीन संपर्क क्रांती या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा. रात्री तीन वाजता सांगलीकरांना संपर्क क्रांती पकडण्यासाठी मिरज रेल्वे स्टेशनला जाणे अत्यंत गैरसोयीचे आहे त्याचप्रमाणे मनमाड व भुसावळ या सांगली शहरापेक्षा अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या रेल्वे स्टेशनवर तीन तीन संपर्क क्रांति गाड्या थांबत आहेत पण सांगली सारख्या दहा लाख शहरी लोकसंख्या असलेल्या रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांति थांबत नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यावर मोठा अन्याय होत आहे तो अन्याय श्री राम करण यादव यांनी दूर करून संपर्क क्रांतीचा सांगली थांबा जाहीर करावा. गेल्या 18 वर्षात सर्वच खासदारांनी व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी संपर्क क्रांतीला सांगली स्टेशनवर थांबा देण्याची मागणी मध्य रेल्वेकडे केली असून ती वारंवार धुडकावली जाते.
3) गाडी क्र 11049/11050 कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ला किर्लोस्करवाडी येथे थांबा द्यावा
4) गाडी क्र 12493/12494 दर्शन एक्सप्रेस ला किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा द्यावा
*सांगली जिल्ह्याची सर्वात मोठी रेल्वे समस्या श्रीराम करण यादव यांनी सोडवावी*
सांगली स्टेशन मध्य रेल्वे पुणे विभागातील दुसऱ्या नंबरचे शहर आहे व शहरी लोकसंख्या 10 लाखाच्या आसपास आहे. मध्य रेल्वे पुणे विभागात सांगली स्टेशन उच्च उत्पन्न देणारे स्टेशन आहे. सांगली स्टेशनवर थांबणाऱ्या बर्याच गाड्यांचे प्रतिफेरी उत्पन्न 80 हजार ते 1 लाख आहे. तरीही पुणे विभागात कमी उत्पन्नाच्या रेल्वे स्थानकांवर नवीन गाड्यांचा थांबा दिला जातो पण उच्च उत्पन्न देणाऱ्या सांगली रेल्वे स्टेशनवर नवीन गाड्यांचा थांबा दिला जात नाही ही सांगलीकरांची मोठी तक्रार आहे.
कुठलीही नवीन गाडी, उन्हाळी दिवाळी, होळी, दसरा विशेष रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा दिला जात नाही. या सर्व विशेष रेल्वे गाड्यांना इतर 35 ते 40 रेल्वे स्टेशनवर थांबा दिला जातो ज्यापैकी 30 स्थानके सांगली पेक्षा कमी उत्पन्न देणारे स्थानके आहेत. सांगली सारख्या मोठ्या स्टेशनवर नवीन रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने सांगली जिल्ह्यावर अन्याय होत आहे. या सर्व रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर प्रवासी संघटना रेल रोको आंदोलनाचा इशारा देतात त्यानंतरच मध्य रेल्वे सांगली स्टेशनवर थांबे देते. तोपर्यंत या सर्व विशेष गाड्या हाउसफुल झालेल्या असतात व सांगलीच्या प्रवाशांना तिकीटच मिळत नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रवासी या विशेष गाड्यांनी प्रवास करू शकत नाहीत. या वस्तुस्थितीमुळे प्रवासी संघटना तसेच सांगली जिल्ह्यातील नागरिक व रेल्वे प्रशासनामध्ये संघर्षाची भूमिका निर्माण होत आहे. ही संघर्षाची भूमिका नाहीशी करण्यासाठी मध्य रेल्वेने सांगली मार्गे जाणाऱ्या सर्व नवीन रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा पहिल्या दिवसापासून द्यावा ही मागणी आहे.