कोल्हापूर विमानतळावर आयएलएस सिस्टीम आणि एअरबस सुविधा लवकरच सुरु होणार.

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 27/11/2023 11:03 PM



कोल्हापूर ः कोल्हापूर विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी आपल्याला दिलीय. त्यामुळेे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशिल आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा अखंडपणे सुरु ठेवण्याबरोबरच कोल्हापूरच्या हवाईसेवेने अन्य ५ शहरेही जोडण्याचा मनोदय खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच कमी दृश्यमान असतानाही विमान उतरण्यासाठी आयएलएस सिस्टीम आणि १८० सिटर एअर बस सुविधा या विमानतळावर सुरु करण्यासंबंधी यावेळी चर्चा झाली. भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार आज कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून सध्या कोल्हापूर विमानतळावर सुरु असणार्‍या विस्तारित आणि आधुनिक टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. २७४ कोटी रुपये खर्चाचे हे महत्वाकांक्षी काम असून, सध्या युध्दपातळीवर या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आजवर झालेल्या कामाची पाहणी संजीवकुमार यांनी अधिकार्‍यांसमवेत केली. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्याशीही चर्चा केली. यावेळी खासदार महाडिक यांच्या हस्ते संजीवकुमार यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी संजीवकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. आजवर झालेल्या टर्मिनल इमारतीच्या बांधकाम प्रगतीबद्दल संजीवकुमार यांनी समाधान व्यक्त केले. १० डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिल्यामळे, डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा आपला मनोदय असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूरचे विमानतळ अत्याधुनिक हवाई सोयी-सुविधांनी परिपूर्ण व्हावे, यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून या विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवला आहे. पावसाळी हवा किंवा दाट धुक्यामुळं कमी झालेल्या दृश्यमान स्थितीमध्ये विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली. याचबरोबर कोल्हापूर विमानतळावर नजीकच्या काळात १८० सिटर एअरबस सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
कमी प्रवासी संख्या असल्याचे कारण सांगत कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा १४ डिसेंबरनंतर खंडित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचाही खुलासा खासदार महाडिक यांनी केला. कोल्हापूर-तिरुपती ही हवाई सेवा खंडित होणार नाही, यासाठी आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न करत आहोत. इतकेच नव्हे तर नांदेड, नागपूर, इंदोर, गोवा या मार्गावर हवाई सेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या बंद असणारी कोल्हापूर-अहमदाबाद हवाईसेवा जानेवारी अखेरपर्यंत सुरु होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर विमानतळाला उजळाईवाडी परिसरातून जोडणार्‍या रस्त्यांची उंची वाढवावी, ही ग्रामस्थांची मागणी रास्तच आहे. आपण या मागणीशी सहमत आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत ग्रामस्थांची मागणी मान्य होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी प्रोजेक्ट इंजिनिअर प्रशांत वैद्य, सरव्यवस्थापक किशनकुमार, इलेक्ट्रीकल इनचार्ज प्रकाश डुबल, नियंत्रण कक्ष अधिकारी राजेश अस्थाना, सिध्दार्थ भस्मे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, रावसाहेब माने, समीर शेठ उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या