कोल्हापूर- मिरज - कलबुर्गी रेल्वेचे मिरज जंक्शन येथे उत्स्फूर्त स्वागत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/10/2026 3:22 AM

*प्रवाशांनी नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा; अक्कलकोट व गाणगापूर थांब्यासाठी पाठपुरावा सुरू*

मिरज : आजपासून नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर–मिरज–कलबुर्गी रेल्वे सेवेचे मिरज जंक्शन येथे रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शनच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सणासुदीच्या काळात, विशेषतः दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवासी नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

कोल्हापूर, मिरज आणि कलबुर्गी या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शन यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मध्य रेल्वे मुंबई प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले की, या रेल्वेला अक्कलकोट व गाणगापूर येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांवर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे या रेल्वेला अक्कलकोट व गाणगापूर येथे थांबा मिळाल्यास प्रवाशांसह भाविकांना मोठा फायदा होणार आहे.

नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे मिरज परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या वेळी रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सोपान भोरावत, नितीन भोरावत, किरण भोरावत, वाय. सी. कुलकर्णी, राहुलराज भोरावत, मधुकर साळुंखे, वैभव भोरावत, देवेंद्र भोरावत, पांडुरंग लोहार, पंडितराव कराडे (तात्या) आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या