संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/09/2026 12:28 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संवर्धन करून भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रभावी जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगार हमी व विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण योजनेच्या माध्यमातून जलतारा, सिमेंट नाला बांध, विहिरींचे पुनर्भरण तसेच बोअरवेल/बोअर पुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतानाच टिकाऊ व उत्पादक मालमत्ता निर्माण करणे, हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. जमीन, पाणी व वृक्षांच्या विकासातून शेती व शेतीशी संबंधित उत्पादक मालमत्ता निर्माण करण्यावर या योजनेत विशेष भर देण्यात आला आहे. या माध्यमातून गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासोबतच पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे.

*शेतकरी, ग्रामस्थांनी कामांची मागणी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी*

शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी आपल्या गावातील तसेच शेतजमिनीवरील आवश्यक जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण आणि बोअरवेल/बोअर पुनर्भरण या कामांना प्राधान्य देता येणार आहे.
ज्या शेतकरी व नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीवर किंवा परिसरात ही कामे घ्यावयाची आहेत, त्यांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून कामाची मागणी नोंदवावी. प्राप्त मागणी व प्रस्तावांची प्रचलित नियमांनुसार तपासणी करून पात्र व अनुज्ञेय कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींनीदेखील आपल्या कार्यक्षेत्रातील जलस्रोत, नाले, पाणलोट क्षेत्र, विहिरी व बोअरची सद्यस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करावेत. तसेच ग्रामसभेत या कामांचा एकत्रित आराखडा तयार करून मान्यतेनंतर पुढील कार्यवाहीसाठी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*एका जलताऱ्यातून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता*

शेतातील पाणी एकवटणाऱ्या उताराच्या ठिकाणी अथवा जमीन चिभडणाऱ्या ठिकाणी साधारण 5 फूट रुंद, 5 फूट लांब व 6 फूट खोल खड्डा तयार करून त्यामध्ये मोठे व मध्यम आकाराचे दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलताऱ्यातून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता असल्याने विहीर व बोअरवेलमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होते.
जलताऱ्यांसह विहीर व बोअर पुनर्भरणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकविणे शक्य होणार आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ही कामे केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होणार आहे.

*नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प*

नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 775 जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 31 हजार 360 कामांना तांत्रिक मान्यता, तर 28 हजार 401 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 हजार 1 जलताऱ्यांची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत.
जलसंधारणाच्या या कामांमुळे संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील व शेतजमिनीवरील आवश्यक जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण, बोअरवेल/बोअर पुनर्भरण तसेच इतर जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
“पाणी अडवा-पाणी जिरवा, भूजल वाढवा-पाणीटंचाई टाळा” या उद्देशाने ग्रामस्थ, शेतकरी व ग्रामपंचायतींनी जलसंधारणाच्या कामांमध्ये व्यापक सहभाग नोंदवावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या