सेवा संकल्प महाअभियानांतर्गत नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६चे आयोजन;शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व डिजिटल प्रशासनातील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविण्याची युवकांना संधी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/09/2026 11:33 AM

नांदेड  : मा. पंतप्रधान यांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या सेवा पर्वाच्या औचित्याने राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी **‘नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार, जिल्हास्तरीय महा-आयडीयाथॉनमधील उत्कृष्ट उपायांना राज्यस्तरीय ‘महा-नाविन्यता आव्हान’ (Maha-Grand Innovation Challenge) मध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे. तसेच निवडक नाविन्यपूर्ण उपायांसाठी शासकीय कार्यादेश आणि उद्योजकता-विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन व इनक्युबेशन सहाय्य उपलब्ध होणार आहे.
पाच प्रमुख क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय
या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, स्टार्टअप्स, आयटीआय व अभियांत्रिकी विद्यार्थी, व्यावसायिक तसेच ग्रामीण नवोन्मेषकांना एक ते पाच सदस्यांच्या संघामध्ये सहभागी होता येईल. सहभागी संघांनी पुढील पाच प्रमुख क्षेत्रांतील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञान व एआय आधारित उपाय सादर करावयाचे आहेत.
कृषी तंत्रज्ञान (AgriTech), आरोग्य सेवा (Healthcare), गुणवत्तापूर्ण शिक्षण (Education), 
पर्यावरण, पाणी व कचरा व्यवस्थापन, डिजिटल प्रशासन व सेवा वितरण या विषयावर अर्ज करावयाचे आहे. 
इच्छुक सहभागी संघांनी ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत Annexure-1 मध्ये मागविण्यात आलेला अर्ज सादर करावा. अर्जासोबत पीडीएफ स्वरूपातील सादरीकरण, दोन मिनिटांचा व्हिडिओ, नमुना प्रारूप (Prototype) तसेच आवश्यक तांत्रिक बाबी सादर करणे अपेक्षित आहे.
प्राथमिक छाननीनंतर निवड झालेल्या उत्कृष्ट संघांना जिल्हाधिकारी, नांदेड तसेच तज्ज्ञ समितीसमोर अंतिम फेरीत आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ट तीन संघांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असून, त्यांची राज्यस्तरीय ‘महा-नाविन्यता आव्हाना’साठी थेट शिफारस करण्यात येणार आहे.
विद्यार्थी व इतर सहभागींसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया
जिल्ह्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, आयटीआय व कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित महाविद्यालयातील प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी (TPO) किंवा इनक्युबेशन केंद्रामार्फत सादर करावेत.
स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि ग्रामीण नवोन्मेषकांनी आपले प्रकल्प Centre for Agro Bio Innovation and Incubation Foundation (CABIIF), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सादर करावेत.
या उपक्रमाचा नोडल विभाग कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) आणि रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RTMSSU), मुंबई यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय अंमलबजावणी करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हे सहआयोजक विभाग आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा अंमलबजावणी समितीमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

*अधिकृत संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना उपलब्ध*

स्पर्धेची सविस्तर माहिती, मार्गदर्शक सूचना तसेच विविध क्षेत्रांतील समस्यांची माहिती (Problem Statements) नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी तसेच इतर सहभागींसाठी अर्ज व प्रकल्प सादरीकरणाची प्रक्रिया संबंधित  https://nanded.gov.in/en तसेच https://srtmun.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, स्टार्टअप्स, संशोधक, व्यावसायिक आणि ग्रामीण नवोन्मेषकांनी ‘नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. हनुमंत रंगा – ९७६४५६७४५६, ७७७६८०४२२० यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Other News

ताज्या बातम्या