मराठवाडा शिक्षक संघाची नांदेड येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/09/2026 7:30 PM

नांदेड :- मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने नांदेड येथे शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बदलती शैक्षणिक परिस्थिती, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, संघटनात्मक बांधणी, शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक अरविंद जगताप, प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, सिनेट सदस्य प्रा. डॉ. उमाकांत राठोड, उपप्राचार्य बालाजी कोंपलवार तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुशील घोटे पाटील उपस्थित होते.

प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांनी संघटना ही केवळ मागण्यांसाठी संघर्ष करणारी यंत्रणा नसून शिक्षकांच्या प्रश्नांना वैचारिक दिशा देणारी शक्ती असल्याचे सांगितले. संघटनात्मक बांधणीसाठी सातत्य, विचार, संवाद आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

प्रसिद्ध साहित्यिक अरविंद जगताप यांनी शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकविणारा घटक नसून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक असल्याचे सांगितले.

सिनेट सदस्य प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांचा अभ्यास करून शिक्षकांनी आपल्या हक्कांसोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीही सक्रिय भूमिका बजावण्याची गरज व्यक्त केली.

चंद्रकांत चव्हाण यांनी शिक्षकांच्या दैनंदिन अडचणी, वाढता प्रशासकीय हस्तक्षेप आणि शिक्षकांच्या सन्मानाच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित करताना, “मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुशील घोटे पाटील यांच्या विजयासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटनेची ताकद अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगून शिक्षकांनी संघटित आणि सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुशील घोटे पाटील यांच्या निवडणुकीच्या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय भूमिका बजावावी आणि सुशील घोटे पाटील यांच्या उमेदवारीला संघटनात्मक पातळीवर पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका काही वक्त्यांनी मांडली.

उपप्राचार्य बालाजी कोंपलवार यांनी बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी नव्या अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमास लातूर जिल्हाध्यक्ष रातोळे, विभागीय सचिव नागोराव माळी, हिंगोली जिल्हाध्यक्ष हरिभाऊ भडके, बसवराज स्वामी, जोंधळे, विश्वंभर भोसले आणि अविनाश सावंत यांच्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांनी केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महासंघाशी संबंधित विविध विषयांवरही यावेळी विचारविनिमय करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी प्रभावीपणे कार्य करावे तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करावा, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत शिंदे  यांनी केले, तर आभार संभाजी पाटील बुड्डे यांनी मानले. याप्रसंगी सौ रेखा सोळुंके,ई डी पाटोदेकर डी बी नाईक आनंद मोरे आर पी वाघमारे, अब्दुल हसीब, बाबाराव घाटे,लक्ष्मण कोंडावार, लगडे यांच्यासह तालुका जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या