नांदेड : महिलांमध्ये बचतीची सवय रुजवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या माता रमाई भीमराव आंबेडकर महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मर्यादित,जिल्हा नांदेड या संस्थेच्या पॅम्प्लेटचे उद्घाटन दि.१९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
प्रशिक्षण केंद्र,खुरगाव नांदुसा येथील प्रमुख तथा संस्थेचे मार्गदर्शक भंते पंयाबोधी थेरो यांच्या मंगलमय हस्ते पॅम्प्लेटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी माता रमाई यांच्या त्याग,संघर्ष व समर्पणातून प्रेरणा घेऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महिलांना स्वयंरोजगार व लघुव्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी सुलभ कर्जपुरवठा करणे,वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी आर्थिक सहाय्य देणे तसेच मुला-मुलींच्या विवाहासाठी सावकारीच्या जाळ्यात न अडकता सन्मानाने कर्जसहाय्य उपलब्ध करून देणे, ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
तसेच समाजातील व्यसनाधीनता कमी करून कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य वाढविणे,महिलांमध्ये आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि सहकार तत्त्वावर पारदर्शक व विश्वासार्ह आर्थिक व्यवहार राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. ‘एक महिला—एक पाऊल,तीन हजार महिला—एक मजबूत शक्ती’ या संकल्पनेतून महिलांना संस्थेचे सभासद होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास सुरेखा राहुल गायकवाड, आरती नितीन तारू, सुषमा डोंगरे, दिगांबर दादा हानमंते,तेजाब पाईकराव,राहुल गायकवाड,नितीन तारू,राजेश बहिरे,प्रकाश गजभारे,दीक्षा गजभारे यांच्यासह महिला व समाजबांधव उपस्थित होते.
ही संस्था महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच पुढील पिढीला शिक्षित,सुसंस्कृत व सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप ‘नमो बुद्धाय,जय भीम’ या घोषणानी झाला.