फ्लॅट बुकिंगची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/12/2025 11:27 AM

ग्राहकाला मिळाली पाच लाखांसह पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई

चिपळूण तालुक्यातील कोलेखाजन येथील रहिवासी वैभव भगवान चिपळूणकर यांनी फ्लॅट बुकिंगसाठी बिल्डरला दिलेली रक्कम परत मिळावी तसेच फसवणुकीच्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी दाखल केलेल्या तक्रारीवर रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर अखेर त्यांना संपूर्ण रक्कम परत मिळाली असून अतिरिक्त पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईदेखिल देण्यात आली आहे.

चिपळूण धामणवणे येथील कल्पतरू डेव्हलपर्स, कपिला पार्क प्रकल्पातील पहिल्या मजल्यावरील १०१ कार्पेट एरिया व ७८.८१ चौ.मी बिल्टअप क्षेत्रफळ असलेली निवासी सदनिका वैभव चिपळूणकर यांनी बुक केली होती. यासाठी बिल्डर संतोष दिनकर परांजपे (कल्पतरू डेव्हलपर्स) यांना त्यांनी चेकद्वारे पाच लाख रुपये दिले होते. त्यानुसार दि. ७ जानेवारी २०२२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरारही करण्यात आला होता. मात्र, प्रकल्पाचे काम दीर्घकाळ कोणत्याही स्तरावर सुरू न झाल्याने तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा केला. काम सुरू न झाल्यास रक्कम परत

देण्याची मागणी केली असता समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने चिपळूणकर यांनी परताव्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. जानेवारी २०२३ मध्ये परांजपे यांनी दोन लाख व तीन लाख रुपये अशा दोन चेकद्वारे रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. परंतु हे दोन्ही चेक बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाल्याने तक्रारदारांना फसवणुकीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात प्रकरणाची तक्रार दाखल केली. ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक ०४/२०२५ अंतर्गत सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी लेखी व तोंडी निवेदन सादर केले. बिल्डर परांजपे यांना नोटीस बजावल्यावर त्यांनी लेखी उत्तरात ३१ मे २०२५ पर्यंत संपूर्ण रक्कम परत देण्याचे कबूल केले. परंतु देय तारीख उलटूनही रक्कम न दिल्याने पुढील सुनावणीस उपस्थित राहून बिल्डर यांनी थोडी-थोडी रक्कम देत जाण्याचे न्यायालयासमोर मांडले. त्याप्रमाणे त्यांनी ११ मार्च २०२५ रोजी ५० हजार रुपये दिले. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेरीस ग्राहक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे बिल्डरने तक्रारदाराला संपूर्ण

पाच लाखांची मूळ रक्कम परत केली.

आयोगासमोर चर्चा आणि तडजोडीनंतर बिल्डरकडून ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. ही रक्कम डी.डी. स्वरूपात तक्रारदारांना देण्यात आली. दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगात दाखल पुरशिसनुसार, पूर्वीचा साठेकरार रद्द करण्यात आला असून संयुक्त तडजोडीस न्यायालयाने मान्यता दिली. परिणामी तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला.

आज मला खरा न्याय मिळाला : वैभव चिपळूणकर

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना वैभव चिपळूणकर म्हणाले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, रत्नागिरी यांच्या न्यायामुळेच मला आज खन्ऱ्या अर्थाने न्याय मिळाला. माझी संपूर्ण रक्कम व नुकसानभरपाई मिळण्यात आयोगाने महत्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात *कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी कायद्याचे प्रचारक प्रसारक, महाराष्ट्र राज्य प्रमुख तसेच माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर* यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचेही चिपळूणकर यांनी नमूद केले.

- Yogesh Pedhambkar

Share

Other News

ताज्या बातम्या