नांदेड :- एज्युटेक बिझनेस अकॅडमी, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्र्रीय शिक्षणक्रांती अभियान आणि सह रोजगार मेळावा मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता गायन–वादन विद्यालयाचे सभागृह, कलामंदिर जवळ, नांदेड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
एज्युटेकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (CMD) निलेश खेडेकर व नॅशनल डायरेक्टर विनायक शिरोळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, याप्रसंगी प्रादेशिक संचालक ज्ञानेश्वर सोळंके, संचालक संतोष पाटील तसेच सुभाष बल्लमखाने यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम आणि रोजगाराशी थेट जोडलेली शिक्षणप्रणाली यावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू, होतकरू व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचा अडथळा दूर करून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. सध्याच्या काळात शिक्षणावर होणारा वाढता खर्च, खासगी शिकवणी व अनावश्यक शैक्षणिक खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणातील खर्चाचा अपव्यय टाळून, किमान खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण देण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.
यासोबतच वाढत्या बेरोजगारीवर प्रभावी उपाय म्हणून सह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून युवकांना नोकरीच्या संधी, स्वयंरोजगार मार्गदर्शन, कौशल्यविकास प्रशिक्षण, उद्योगसृष्टीशी थेट संपर्क तसेच करिअर नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील रोजगार संधी, उद्योजकतेसाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे युवकांचा आत्मविश्वास वाढेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
शिक्षणक्रांती अभियान व सह रोजगार मेळाव्याची घोषणा होताच नांदेड जिल्ह्यासह परिसरातील युवक, विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांचे सक्षम एकत्रीकरण साधत, प्रत्येक गरजू व होतकरू युवकाला १०० टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा नवा, दूरदृष्टीपूर्ण आणि समाजाभिमुख पुढाकार शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आशेचा नवा किरण ठरणार आहे.
तरी बेरोजगार युवकांनी, करिअरच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी, विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.