मुलाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून सेलूकर दांपत्याने जपली माणुसकी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/12/2025 8:55 PM

नांदेड :- आजच्या स्पर्धात्मक आणि दिखाऊ समाजात वाढदिवस म्हणजे मोठा केक, महागडी सजावट आणि खर्चिक समारंभ अशीच संकल्पना रूढ झाली असताना, नांदेडच्या डॉ. प्रवीण कुमार सेलूकर आणि त्यांच्या पत्नी स्वाती सेलूकर यांनी या संकल्पनेला माणुसकीचा नवा अर्थ दिला आहे. आपल्या सुपुत्र सुधांशू प्रवीणकुमार सेलूकर याचा वाढदिवस त्यांनी थाटामाटात न साजरा करता, कुटुंबापासून दुरावलेल्या वृद्ध माता-पित्यांच्या सहवासात साजरा करून समाजासमोर एक दीपस्तंभ उभा केला आहे.

दिनांक १४ डिसेंबर रोजी सुधांशूचा वाढदिवस होता. दरवर्षी घरगुती समारंभावर होणारा खर्च टाळून, तोच खर्च समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरावा असा विचार सेलूकर दांपत्याने केला. त्यातूनच ‘संध्या छाया’ वृद्धाश्रम (गजानन महाराज मंदिर परिसर, नांदेड) येथे वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमात केवळ संध्या छाया वृद्धाश्रमच नव्हे, तर रुस्तुमजी मेवावाला वृद्धाश्रम आणि ताराबाई बोधूलालजी जैन वृद्धाश्रम येथील सर्व वृद्ध व्यक्तींनाही प्रेमाने आमंत्रित करण्यात आले.
वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, तर गरजूंच्या आयुष्यात उब निर्माण करणे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. थंडीच्या दिवसांत वृद्धांना आधार मिळावा म्हणून उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. गोड-धोड भोजनासह मिळालेल्या या मायेच्या ऊबेने अनेक वृद्धांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले.

अनेक दिवसांपासून आपल्या मुलांच्या सहवासापासून दूर असलेल्या या वृद्ध माता-पित्यांना, या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणही कुणाचेतरी आहोत ही भावना अनुभवता आली.

यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. प्रवीण कुमार सेलूकर म्हणाले,

> “वाढदिवस म्हणजे खर्चाचा दिखावा नव्हे, तर आनंद वाटण्याची संधी आहे. वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान पाहून आमच्या मुलालाही खरा वाढदिवसाचा अर्थ कळला. हाच आमच्यासाठी खरा आनंद आणि खरा सण आहे.”



समाजासाठी प्रेरणादायी पाऊल

या उपक्रमासाठी संध्या छाया वृद्धाश्रमाच्या सचिव सौ. सुरेखा पाटणी, व्यवस्थापक एस. एल. करेवार, तसेच प्रा. शरद वाघमारे, आनंद शर्मा, मारोती डाखोरे आणि राणीताई डाखोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

आज जिथे नात्यांपेक्षा दिखाव्याला महत्त्व दिले जाते, तिथे सेलूकर दांपत्याने माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
असा वाढदिवस केवळ एक कार्यक्रम न राहता, समाजाला जागं करणारा विचार ठरतो.

Share

Other News

ताज्या बातम्या