लोकअदालतीत अपघातग्रस्ताच्या वारसांना ८५ लाख रुपयांची नुकसानभरपाई

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 15/12/2025 8:53 AM


अहिल्यानगर, दि. १४ : येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका महत्त्वपूर्ण मोटार अपघात दाव्याचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात आला आहे. सोलापूर महामार्गावरील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ८५ लाख रुपये इतकी नुकसानभरपाई देण्याचे 'युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी'ने मान्य केले असून, याबाबतचा धनादेश पक्षकारांना सुपूर्द करण्यात आला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा न्यायाधीश श्रीमती भोसले व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दावा निकाली काढण्यात आला.

लोकअदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना जलद न्याय मिळावा, या उद्देशाने विमा कंपनीचे अधिकारी व वकील यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणण्यात आली होती. त्यास यश येऊन ८५ लाख रुपयांच्या तडजोडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सारसनगर (अहिल्यानगर) येथील दीपक विलास पवार (वय ३९ वर्षे) यांचा २४ जून २०२४ रोजी सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अज्ञान मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने वारसांनी ॲड. खेडकर यांच्यामार्फत मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाकडे नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता.

या प्रकरणात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने ॲड. अशोक बंग यांनी काम पाहिले. तडजोडीसाठी कंपनीचे अधिकारी अविनाश अंबाडे, संजय चौधरी, अनिल नरोलिया, शैलेश तिवारी व यशवंत सावंत यांनी सहकार्य केले.

#लोकअदालत #विक्रमीनुकसानभरपाई #मोटारअपघात #अहिल्यानगरन्याय #पीडितवारस #न्यायव्यवस्था #विमाकंपनी #तडजोड #जलद_न्याय #LegalAid

Share

Other News

ताज्या बातम्या