नांदेड : दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण असणारी माळेगाव येथील यात्रा दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. प्रवासी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे यात्रेकरूंचा ओघ वाढला असून यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा, सुरक्षा, प्रवासी व्यवस्था व मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज नांदेड व लातूर लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण व डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी प्रशासनाला दिले.
माळेगाव येथील यात्रा चार दिवसानंतर सुरू होणार आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व लोहा ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजक असतात. आज या तीनही यंत्रणेने केलेल्या तयारीच्या संदर्भात पूर्वतयारी पाहणी करताना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
माळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह परिसरात झालेल्या या बैठकीला नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे , पंचायत समितीचे पदाधिकारी,यात्रा आयोजनात सहभागी असणारे मान्यवर, स्थानिक आयोजक व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीमध्ये पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन, कृषी पशुसंवर्धन, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण बीएसएनएल, महामार्ग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषधी प्रशासन, वन, जलसंधारण, समाज महिला व बालकल्याण पंचायत समिती लोहा अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यात्रे संदर्भात या विभागाने काय नियोजन केले याचा आढावा खासदार महोदयांनी घेतला.
या आढावा बैठकीमध्ये यात्रा आयोजन करणाऱ्या मान्यवरांनी तसेच गावकऱ्यांनी ही काही सूचना केल्या, यामध्ये माळेगावला 'अ ' दर्जाचा तीर्थक्षेत्राची मान्यता मिळावी. माळेगाव जवळ महामार्गावर ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा, माळेगावच्या लावणी महोत्सवाला सांस्कृतिक विभागाची मान्यता मिळावी, माळेगावात आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी हायमास प्रकाश व्यवस्था लावण्यात यावी, सर्व खाजगी कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात यावे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यात यावे, माळेगावला बँक सुरू करण्यात यावी, यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवारा व्यवस्था उभारण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही खासदारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. खासदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूची सुरक्षा आणि प्राथमिक सुविधा याबाबत दक्ष असण्याचे सांगितले. त्यांनी या ठिकाणी हायमास लाईट, यात्रेकरू आणि येणाऱ्या पशुधनासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, पोलिसांची सुरक्षा, महिला पोलिसांची उपलब्धता, अवैध दारू विक्रीवर नियंत्रण यासंदर्भात काळजी घेण्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रायव्हेट मोबाईल नेटवर्क कडून तात्पुरती काही व्यवस्था होत असेल तर या संदर्भात उपाययोजना करण्याचे प्रशासनाला सांगितले.
लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी यावेळी तीर्थक्षेत्राचा ' अ ' दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माळेगावला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा व यात्रेतील सहभागीत्वाचा सन्मान करण्यासाठी सन्मान चिन्ह देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याकडे अधिक गंभीरतेने लक्ष वेधण्याबाबत सांगितले.तसेच या ठिकाणाच्या तलावाची स्वच्छता करून ते पाणी पशुधनाच्या पिण्यायोग्य राहील याची खातरजमा करण्याची सूचना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले.
माळेगावची यात्रा 29 डिसेंबर रोजी देव स्वारी पालखीने सुरू होणार आहे. 30 डिसेंबरला पशु, अश्व,शेळी, कुक्कुट व श्वान प्रदर्शन,31 डिसेंबरला कुस्त्यांची भव्य दंगल ,1 जानेवारीला पारंपारिक कला महोत्सव व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, 2 जानेवारीला लावणी महोत्सव व ३ जानेवारीला शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.२ जानेवारीचा लावणी महोत्सवात नऊ लावणी संच सहभागी होणार आहे.