आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*अपशिंगे (मिलिटरी) गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध*
*- माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई*
सातारा, दि. : अपशिंगे (मिलिटरी) गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील 46 जवान शहिद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य सैन्य दलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांच्या या बलिदानामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. या गावच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही माजी सैनिक कल्याण, पर्यटन, खनिकर्म मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे आजी-माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, गावचे सरपंच तुषार निकम, माजी कॅप्टन उदाजीराव निकम, शंकर माळवदे आदी उपस्थित होते.
माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई म्हणाले, अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील कुटुंबातील एकतरी व्यक्ती देश सेवा करीत आहेत. या गावातील माजी सैनिकांच्या शार्याची माहिती बाहेरील लोकांना व्हावी यासाठी वॉर मेमोरियल तयार करण्यात येईल. यातून युवा पिढीला प्रेरणा मिळून देश सेवेसाठी सैन्यदलात जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अपशिंगे (मिलिटरी) गावावर प्रेम, आपुलकी व आदर आहे. या गावातील रस्ते, शाळा व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्यात येईल, अशी ग्वाहीही माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.