दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिण्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजन करते.
महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा जपणारी व मराठवाडयाचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्रीक्षेत्र खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर महामार्गावरील माळेगाव या गावी भरते. माळेगाव येथे मुख्य मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. हजारो वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी मंदिरातील महादेवाचे रुप म्हणजे खंडोबा याठिकाणी दर्शनासाठी विराजमान आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. श्रीक्षेत्र माळेगाव येथील नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा असून अनेकजणांचे खंडोबा हे कुलदैवतही आहे. या यात्रेच्या निमित्ताने देशाभरातून विविध भागातून सर्व जातीधर्माचे लोक येथे येतात.
याठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचे, एकात्मतेने नटलेल्या विविधतेचे दर्शन पाहावयास मिळते. याठिकाणी मोठे-मोठे आकाश पाळणे सर्वाचे आकर्षण असून अनेक हौशी यात्रेकरु याचा आनंद घेतात. याठिकाणी जिल्हा परिषदेच्यावतीने विविध माहिती प्रदर्शने, कृषी प्रदर्शने, आरोग्य शिबिर, खाद्य पदार्थाचे महोत्सव भरविले जातात. या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असल्याने येथील विविध शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाटक असा समृद्ध मराठी लोककला संस्कृतीचा अविष्कार पाहायला मिळतो. यात्रा ही जवळपास एक महिनाभर चालते. यात इथला जनावराचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो. यात घोडे, उंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळया, मेंढया, कुत्रे आदी पशु पक्षी इतर राज्यातूनही लोक घेवून येतात. मागील तीन ते चार वर्षापासून माळेगाव यात्रेत श्वानांची खरेदी विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या नांदेडच्या भागात आणि लातूर जिल्ह्यात आढळणारा कारवान आणि पश्मी जातीच्या श्वानाची पसंती वाढली आहे. त्याचबरोबर लाब्राडोर, डोबरमन आणि जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांना पण मोठया प्रमाणात पसंती दिली जात आहे.
यावर्षी 29 डिसेंबर ते २ जानेवारी 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत माळेगाव यात्रा भरणार असून 29 डिसेंबर रोजी यात्रेच्या पहिल्या दिवशी देवस्वारी व पालखी पूजन, महिला व बालकांसाठी स्पर्धा, भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अश्व, श्वान, कुकूट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उदघाटन व महिला आरोग्य शिबिर होणार आहे. तीसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल, चौथ्या दिवशी शंकरपट बैल गाडा शर्यत, पारंपारिक लोककला महोत्सव, २ जानेवारी पाचव्या दिवशी सकाळी 11 वाजता पशुसंवर्धन विभागाचे बक्षिस वितरण, दुपारी ३ वाजता लावणी महोत्सव असे सर्व कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक परंपरेनुसार मल्लांना आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी कला व लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली, शंकरपट आयोजित केले जातात. कुस्त्यांच्या आखाडयातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविण्यात येते.
या यात्रेचे नियोजन दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. याही वर्षी यात्रेचे उत्तम नियोजन केले असून यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सर्व विभागांना करावयाच्या उपाययोजनेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाने आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण केली असून यात्रा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन केले आहे.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन भरविण्यात येणार असून या यात्रेचे वैशिष्ट म्हणजे येथे पशुचा बाजार भरविला जातो. पशु, अश्व, कुक्कूट यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच पशुसाठी लागणारे सर्व साहित्य, बैलाचा साज अशा अनेक वस्तु ज्या इतर यात्रेत मिळणार नाहीत अशा आगळया- वेगळया वस्तू याठिकाणी पाहावयास विक्रीस उपलब्ध असतात. ग्रामीण संस्कृतीची नाळ जोडणारी ही यात्रा असून ग्रामीण भागात लागणारे शेतीविषयक साहित्यांची दुकाने इथे थाटली जातात. महिलांसाठी गृहपयोगी वस्तु, लाकडी साहित्य, दुर्मिळ अशा कवडयाच्या माळेपासून ते बैलांच्या साजापर्यत वैविध्यपूर्ण वस्तू या यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध असतात.
यात्रेत वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळी, उद्योग दालने, मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरखून जातात अशी प्रेक्षणीय ही यात्रा असते. हा सांस्कृतिक वारसा महोत्सवाच्या रुपाने जवळून पाहण्यासाठी नागरिकांनी आपल्यासोबत नवी पिढी घेवून जाणे आवश्यक आहे. शेकडो वर्षाचा हा आपला वारसा या पिढीकडून त्या पिढीकडे देताना कर्तव्य म्हणून याकडे बघण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यावर्षी ‘प्लास्टीक मुक्त माळेगाव यात्रा’ भरविण्यावर भर आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपआपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्लास्टीकचा वापर करु नये. यासाठी प्लास्टीक ग्लास, प्लेट, पिशवीचे पुष्पगुच्छ, प्लास्टीक आवरण यांचा वापर करु नये याऐवजी स्टील ग्लासचा वापर करावा. नळाच्या तोटीला स्टील ग्लास साखळीने बांधून ठेवावे. अशा अनेक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत.
माळेगाव ही यात्रा शेकडो वर्षाची परंपरा आहे. यात्रेचे स्वरुप हळूहळू बदलत आहे. काही जून्या अंधश्रध्दांना, चालीरितीना टाळून पुढे जाताना पूर्वीच्या अनेक बाबी कालबाह्य होत आहेत. मात्र असे असले तरी आधुनिकतेचा कास धरण्यासाठी समाजाने स्विकारलेले परिवर्तन प्रत्यक्ष डोळयाने बघणे, हे देखील या यात्रेचे वैशिष्ट ठरत आहे. त्यामुळे चला कुटूंबासह माळेगावच्या स्वारीवर गेले पाहिजे. बेल भंडाऱ्याची उधळण होताना आमच्या सांस्कृतिक गतवैभवाचा परिचयही झाला पाहिजे.