आरटी आय न्यूज नेटवर्क
(दहिवडी प्रतिनिधी)
दहिवडी दि:माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयातील इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आई समोरच दहिवडी फलटण रोडवरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी ४.३० वाचण्याच्या सुमारास घडली आहे
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात सदरची अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता ९ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती . मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणेच ती विद्यार्थिनी शाळेत आली होती. पण ती वर्गात दप्तर ठेवून बाहेर गेली . ही बाब शाळेतील शिक्षकांनी सदरच्या विद्यार्थ्यांनीच्या आईला फोन करून सांगितली. याबाबत आईने शाळेत येऊन खात्री केली असता मुलगी शाळेत आढळून आली नाही, परंतु दप्तर मात्र शाळेत मिळाले.
दप्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती. सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ती मुलगी शाळेच्या जवळ दिसली. त्यावेळी ती आई आपल्याला आता ओरडेल, मारेल या भीतीने ती शाळेच्या समोरून माणगंगा नदीच्या दिशेने पळाली. मुलगी पुढं व आई मागे पळत दहिवडी फलटण रोडवरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पोहचल्या. यावेळी आई तिला थांब थांब म्हणत असताना मुलीने दप्तर शेतात फेकले आणि नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.
सदर घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे स्टाफसह घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने मुलीस बाहेर काढले. तिला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार बापू खांडेकर करत आहेत.