श्री. खडोबा व माता म्हाळसा देवीचा हळदी व विवाह सोहळा उत्साहात

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 11/12/2024 7:40 AM

श्री. खडोबा व माता म्हाळसा देवीचा हळदी व विवाह सोहळा उत्साहात ; मंदिर परिसरात भव्य विद्युत रोषणाई व फटाक्याची बाजी... 


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

दहिवडी दि:मलवडी खंडोबाचा वार्षिक रथोत्सव बुधवार ११ डिसेंबर रोजी आहे. यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून आतापासूनच मेवा-मिठाईची दुकाने, खेळण्याची दुकाने तसेच मोठ्या पाळण्यांनी मलवडी गजबजून गेली आहे.
    श्री. खंडोबाच्या यात्रेस सोमवार २ डिसेंबर रोजी हळदी सोहळ्याने सुरुवात झाली. शुक्रवार ६ डिसेंबर रोजी श्री खंडोबा व माता म्हाळसा देवी यांचा विवाह सोहळा होता. यानिमित्त मंदीर व परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री साडे नऊ वाजता तुतारी, सनई-चौघडे व वाद्यवृंदाच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजतगाजत श्रीं चा बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले. यावेळी श्रीं खंडोबा व माता म्हाळसा देवी यांच्यासाठी उत्तमप्रतीची वस्त्रे घेण्यात आली. श्रीं चा बस्ता घेवून सर्वजण परत मंदिरात आले. पुजार्‍यांनी विधीवत श्री खंडोबा व माता म्हाळसा यांना नवीन पोशाख चढविला.

श्रींच्या लग्नसोहळ्यासाठी मलवडीसह पंचक्रोशीतून आलेल्या महिला व पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदीर परिसर फुलून गेला होता. यावेळी सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. रात्री साडेदहा वाजता लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राम्हण व जंगम यांनी सुरुवात केली. रात्री ठिक ११:१५ मिनिटांनी श्रीं च्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपाच्या उजव्या बाजूला अशा दोन ठिकाणी श्रीं च्या मुर्ती आहेत. त्यामुळे एक लग्न ब्राम्हण व एक लग्न जंगम अशी दोनवेळा लग्न लावली जातात. अतिशय भक्तीपुर्ण व उत्साही वातावरणात श्रीं चा विवाह सोहळा रात्री पावणे बाराच्या सुमारास संपन्न झाला.

त्यानंतर फटाक्यांची दणकेबाज व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार धुपारतीचे मानकरी, ब्राम्हण, जंगम, माळी (खांदेकरी), फुल माळी, कुंभार, कासार, लोहार, सुतार, नाईक, गडशी, जिनकर, मातंग, पुजारी, वाजंत्री, वाघे, मैराळ, नाभिक, परीट आदी विविध मानकर्‍यांना मानाची रक्कम देण्यात आली.
: भरीत रोडग्याचा महाप्रसाद
चंपाषष्ठीनिमित्त मगर पाटील भावकी कडून आरती नंतर भक्तांसाठी भरीत रोडग्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बाजरीच्या दीड हजार भाकरी, सव्वाशे किलो वांग्यांची भाजी, पन्नास किलो दही, वीस किलो मिरचीचा ठेचा असे महाप्रसादाचे स्वरुप होते.
पुजार्‍यांचा खास सत्कार
यंदाचे श्री खंडोबाचे सालकरी पुजारी जयंत भिंताडे व त्यांच्या कुटुंबियांनी श्री खंडोबाची मनोभावे सेवा केली असून दररोज अतिशय सुंदर पध्दतीने पुजा व सुशोभिकरण केले आहे. त्यांनी केलेल्या उत्तम सेवेबद्दल नवलेवाडी येथील नाईक समाज तसेच सत्रेवाडी-नवलेवाडी ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
: श्री खंडोबा व माता म्हाळसा देवीचा विवाह सोहळा लावताना पुजारी,ब्राह्मण,जंगम व सर्व सेवेकरी,ग्रामस्थ

Share

Other News

ताज्या बातम्या