*नागरिक जागृती मंचच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या सांगली-परळीवैजनाथ एकसप्रेस व सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे*
*सांगली रेल्वे स्टेशनला विस्तारित केल्यामुळे सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस गाडीत पहिल्या वर्षी 1 लाख ज्यादा प्रवासी प्रवास करतील*
*सांगली-परळीवैजनाथ एक्सप्रेस गाडीत प्रति वर्ष 40 हजार अतिरिक्त प्रवासी प्रवास करतील*
*सांगली स्टेशन पासून सुरू झालेल्या 2 नविन एक्सप्रेस गाड्यांमुळे वर्षभरात रेल्वेचे 1.5 लाख प्रवासी वाढतील व रेल्वेला मोठे उत्पन्न सांगलीतून मिळेल*
जगातील सर्वात मोठी हळदी बाजारपेठ व देशातील सर्वात मोठी गुळ बेदाणा बाजारपेठे जवळ असलेले सांगली रेल्वे स्टेशन. आशियातील सर्वात मोठ्या साखर कारखान्यापासून फक्त 2 किलोमीटर, सांगली बस स्थानकांपासून 2 किलोमीटर, सांगलीच्या प्रसिद्ध पंचायतन गणपती मंदिरापासून 2 किलोमीटर, विश्रामबाग येथून 2 किलोमीटर, सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयपासून फक्त 3 किलोमीटर, कुपवाड एमआयडीसीतून 3 किलोमीटर व जगप्रसिद्ध हरिपूर संगमेश्वर मंदिरापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर सांगली रेल्वे स्टेशन आहे.
पण जिल्हा मुख्यालय, महानगरपालिका मुख्यालयच्या सांगली रेल्वे स्टेशनवरून कर्नाटक व पंढरपूर, कुर्डूवाडी, लातूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या नसल्याने प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने वारंवार रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे मुंबई व पुणे विभाग व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले तसेच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सांगली स्टेशन पासून कर्नाटक व पंढरपूर, लातूर साठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिक जागृती मंचने वेळोवेळी सांगली रेल्वे स्टेशन वरून रेल्वे गाड्या वाढवण्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. सांगली रेल्वे स्टेशन बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नागरीक जाग्रुती मंच सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या विविध रेल्वे गाड्या बद्दल जनजागृती मोहीम राबवत आहे.
याचा लाभ हा झाला की सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस ही पहिली एक्सप्रेस रेल्वे गाडी सांगली स्टेशनवरून सुरू झाली. त्याच दिवशी सांगली-परळीवैजनाथ एक्सप्रेस गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू झाली.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांना माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहिती प्रमाणे आरक्षित तिकिटांचा आकडा व सांगली रेल्वे स्टेशनवरून वाढलेल्या अनारिक्षित तिकिटांच्या आकडा तसेच सांगली स्टेशनवरून वाढलेली मासिक धारकांची प्रचंड मोठी संख्या लक्षात घेता खालील आकडे समोर येतात.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सुरू झालेल्या या 2 एक्सप्रेस गाड्यांना प्रवाशांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला असून राणी चेनम्मा एक्सप्रेस मध्ये सांगली रेल्वे स्टेशन वरून आरक्षित व अनारक्षित तिकिटे मिळून रोज 200 ते 225 प्रावासी येऊन-जाऊन प्रवास करत आहेत.
सांगली-परळी वैजनाथ एक्सप्रेस गाडीमध्ये पहिल्या 4 महिन्यांत येऊन-जाऊन 11 हजारच्या आसपास प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये 7 हजार तिकीटधारक व 4 हजार मासिक पासधारकांनी सांगली रेल्वे स्टेशन पासून प्रवास केला.
पहिल्याच वर्षी सांगली-बेंगलोर राणी चेनम्मा एक्सप्रेस मधून अंदाजे 80 हजार ते 1 लाख प्रवासी प्रवास करतील.
सांगली-परळीवैजनाथ एक्सप्रेस मध्ये पहिल्य् वर्षी 33 हजार ते 40 हजार प्रवासी प्रवास करतील असा प्राथमिक अंदाज आहे. प्रवाशांची सांगली स्टेशनवरून प्रवास करण्याची वाढती गर्दी लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही गाड्या वर्षभरात 1 लाख प्रवाशांचा आकडा पार करतील हे मात्र निश्चित आहे.
या आकडेवारीच्या आधारे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच सांगली रेल्वे स्टेशनवरून खालील नवीन रेल्वे गाड्यांची मागणी करणार आहे. मागणी करण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून मिरज येथे थांबून पुढे जाणार असल्याने सांगलीतून सुरू होणाऱ्या नवीन रेल्वे गाड्यांचा फायदा सांगली व मिरज दोन्ही रेल्वे स्थानकांना होणार आहे. तसेच रेल्वे विभागालाही सांगली रेल्वे स्टेशन वरून सुरू होणाऱ्या गाड्यांमुळे सांगली व मिरज दोन्ही रेल्वे स्थानकांमधून प्रवासी मिळणार असल्यामुळे या गाडयांचा मोठा फायदा रेल्वेला होईल. सांगली रेल्वे स्टेशनवर 5 प्रवासी गाड्यांचे प्लॅटफॉर्म असून हे प्लॅटफॉर्म दिवसभर मोकळे असल्याने सांगली रेल्वे स्टेशन वरून रोज 25 नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची क्षमता आहे.
*मागणी करण्यात येणार्या नविन गाड्या*
1) सांगली-कोचूवेली(तिरुवनंतपुरम) एक्सप्रेस व्हाया मिरज, मडगाव(गोवा), मंगळूर एरणाकुलम
2) सांगली-विशाखापटनम एक्सप्रेस वाया मिरज, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा
3) सांगली-चेन्नई एक्सप्रेस वाया बेळगाव, हुबळी, गदग, बल्लारी
4) सांगली-कोईम्बतूर एक्सप्रेस वाया बेंगलोर
5) सांगली-गुंटूर एक्सप्रेस वाया मिरज, लातूर, नांदेड, निजामाबाद, वारंगल
6) सांगली-हावडा (कलकत्ता) एक्सप्रेस वाया मिरज, लातूर, नागपूर, रायपूर, बिलासपूर