सांगली प्रतिनिधी
सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली पुलावर दोनच दिवसापूर्वी पुलाला सुरक्षा कठडा नसल्याने भरधाव गाडी पुलावरून खाली नदीपात्रात कोसळल्याने सांगली मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याआधीही या ठिकाणी दोन वेळा अशा पद्धतीनेच अपघात झाले असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून याकडे डोळेझाक का होत आहे? असा प्रश्न लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित करत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला केव्हा जाग येणार? असा सवाल केलाय.
दरम्यान या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले असतानाही आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनास जाग येणार? सदर ठिकाणी ताबडतोब सुरक्षा कठडे बांधण्यात यावेत अन्यथा सदर पुलावर रास्ता रोको आंदोलन छेडून महामार्ग बंद करू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.