राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/10/2024 8:00 PM

नांदेड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची व लोकसभा पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे सर्वांनी पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित बैठकीत राजकीय प्रतिनिधींना, प्रिटींग प्रेसचे मालक तसेच वृत्तपत्रांचे मालक व प्रकाशकांना ते मार्गदर्शन करत होते.
    
    आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.यामध्ये स्थिर निगराणी पथके, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.सर्व राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी ही भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसारच काम करणे बंधनकारक आहे.प्रचारासाठी आवश्यक बाबींची पूर्वपरवानगी घेवूनच प्रचार सभा,वाहने याद्वारे प्रचार केला जावा,असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

     जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.प्रचार सभांच्या ठिकाणी भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक बाबीची पूर्वपरवानगी घेवूनच अशा सभांचे आयोजन केले जावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातींचा हिशेब माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत ( एमसीएमसी ) ठेवल्या जाते. त्यामुळे जाहिराती देताना खर्चाच्या ताळमेळाचे भान असावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात जाहिरातींची परवानगी घेऊन प्रकाशित करण्याबाबतही त्यांनी अवगत केले. यावेळी वेगवेगळे विभाग प्रमुख उपस्थित होते.

       प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांनी मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, सर्व राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेवून मतदान केंद्र, प्रचारासाठी आवश्यक परवानग्या आदी बाबींची माहिती द्यावी. जेणेकरून ऐनवेळी होणारी गैरसोय टाळणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
      
        या बैठकीला निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, नांदेड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे,नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी उपस्थित होते. या बैठकीला मनसेचे रवी राठोड, राष्ट्रीय काँग्रेसचे उद्धव लांडगे,आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड जगजीवन भेदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डी.व्ही.जांभरूणकर,दत्ता पाटील कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवानराव आलेगावकर यांचा समावेश होता.

 *वृत्तपत्रांचे प्रकाशक,मालक प्रिटींग प्रेस मालक* 

     जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी वृत्तपत्राचे प्रकाशक मालक प्रिंटिंग प्रेसचे मालक यांचीही बैठक घेतली. कोणत्याही लिखित साहित्यावर ते साहित्य कोणी दिले त्याचे नाव प्रकाशित करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जाहिराती प्रकाशित करताना एमसीएमसी समितीमार्फत त्याचे सनियंत्रण करण्यात येत आहे हे लक्षात ठेवावे. त्याची जाहिरात छापताना त्या संदर्भातील शासकीय दरानुसार रक्कम पक्षाच्या खात्यात तर उमेदवाराची जाहिरात छापल्यास निर्धारित दरानुसार त्याची रक्कम उमेदवाराच्या खात्यामध्ये जमा केली जाते. विधानसभा उमेदवारासाठी 40 लक्ष रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे याची पूर्वकल्पना जाहिरातदारांना देण्यात यावी. तसेच शेवटच्या दोन दिवसात कोणतीही जाहिरात प्रकाशित करताना ती आधी प्रमाणित करून घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला सर्वश्री गोवर्धन बियाणी,आर.एस.भिसे,किरण देशमुख,मुन्तजीबोद्दीन,महेंद्रसिंग भीमसिंह ठाकूर,श्यामसुंदर सुदाम कांबळे,अतुल भुरेवार,संजय खाडे,शेख मोहम्मद कलीम,जयपाल वाघमारे, रमेश पांडे,चंद्रकिरण कुलकर्णी,प्रल्हाद लोहेकर आदी मालक,संपादक तसेच प्रिंटिंग प्रेसचे मालक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या