गोदाई महोत्सवातील पहिल्या दिवशी किशोर पुराणिक,प्रा.रविशंकर झिंगरे,पूजा कळमकर यांच्या कसदार अभिनयाने'द्विगत'नाटक नांदेडकरांना भावले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/10/2024 3:47 PM

नांदेड :- अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेड व मुक्ताई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी साजरा होणारा गोदाई महोत्सव म्हणजे नांदेडकरांसाठी एक पर्वणीच असते. यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी परभणीतील रंगकर्मींनी सादर केलेल्या' द्विगत' या नाटकाने रसिकांच्या मनात कायमचे घर केले.
वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्य व्यक्तिमत्त्वावर आधारित एक नाट्यानुभव अर्थात एका नाटकाचा  संवाद कवितेशी.....'  द्विगत ' सादर झाले. सुप्रसिद्ध नाट्यकलावंत किशोर पुराणिक, या नाटकाचे सिद्धहस्त लेखक प्रा. रविशंकर झिंगरे, पूजा कळमकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने नाट्य रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.या नाटकाचे लेखक रविशंकर झिंगरे असून विजय करभाजन यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे कवी व वि. वा. शिरवाडकर हे प्रतिभावंत नाटककार यांना एका सूत्रात बांधून नाट्य रसीकांच्या समोर परभणीच्या या कलावंतांनी जिवंत उभे केले. आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांची गद्यमय व पद्यमय लेखनाची उकल नाट्यलेखक प्रा. रविशंकर झिंगरे यांनी प्रचंड ताकदीने केली आहे. शिरवाडकरांच्या नाटकांमध्ये कवी मनाचे कुसुमाग्रज कधी डोकावतात, त्यांच्या काव्य प्रतिभेचे दर्शन या ठिकाणी होते तर त्यांच्या कवितेमध्ये नाट्यपूर्ण वर्णनाची शैली पहावयास मिळते.


 द्विगतची कल्पनाच मुळात अफलातून आहे. वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्य व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग, म्हणजे कवी कुसुमाग्रज आणि नाटककार शिरवाडकर हे त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी स्वतःच्या साहित्यावरती गप्पा मारताहेत. त्यांच्याच साहित्याची उकल त्यांच्याच भावविश्वातून करण्याची ही कल्पनाच अतिशय भन्नाट आहे जी रविशंकर झिंगरे यांनी कागदावरती उतरवली आहे. मुळामध्ये रविशंकर झिंगरे हे अतिशय उत्कृष्ट कवी, नंतर नाटककार. त्याचप्रमाणे दिग्दर्शक विजय करभाजन हे सुद्धा गेल्या 40-45 वर्षांपासून अनेक स्पर्धांमधून वेगवेगळ्या संहितांचे अतिशय प्रभावी सादरीकरण करत आलेले आहेत. परभणीच्या नाट्यसृष्टीमध्ये काम करणाऱ्या तमाम कलावंतांसाठी, तंत्रज्ञांसाठी रवी झिंगरे आणि विजय करभाजन हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्वे आहेत. ज्यांच्या परिसस्पर्शामुळे अनेक कलावंताच्या पिढ्या घडत आहेत. कारण नुसती ही कल्पना सुचून चालत नाही तर त्या कल्पनेला प्रत्यक्ष संहितेमध्ये उतरवणे आणि त्यासंहितेचं मंचावरती प्रभावी पद्धतीने सादरीकरण करणे हे आव्हान या दोघांनी लीलया पेललं आहे. अशा या संहितेमध्ये  नट म्हणून काम करत असताना अनेक प्रकारे भूमिका उलगडत जाते. ज्यामध्ये वेळोवेळी या दोघांची मदत झाली. या नाटकांमध्ये भूमिका करत असताना शब्दामागे दडलेला अर्थ आपल्या अभिनयातून पोहोचवताना वापरलेली शरीरभाषा, मुद्राभिनय आणि वाक्यांची फेक ही अतिशय महत्त्वाची आहे. 
नाटक पाहण्यासाठी आलेले श्रोते नाटकातील नट घरी नेत असतात. असाच काहीसा प्रकार याही नाटकातील आपल्या भूमिका अतिशय ताकदीने पेलवणारे तीनही कलावंत रसिकांच्या मनात घर करून गेले. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी लिहिलेलं विदूषक हे नाटक एक गूढ आणि गहन जीवनाचा अभ्यास करणारी कलाकृती आहे. या नाटकाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे जीवनातील विरोधाभास आणि मानवाच्या असहायतेची भावना. या नाटकातील विदूषक हे पात्र जीवनातील अस्थिरता, विषमता आणि कटुता यांचं प्रतीक आहे.
विदूषकाच्या माध्यमातून शिरवाडकरांनी समाजातील विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विदूषक हसवणारा, लोकांचे मनोरंजन करणारा असला तरी त्याच्या आतल्या भावना आणि विचार वेगळे असतात. त्याच्या जीवनात दुःख, वेदना, नकारात्मकता आहे, पण समाजासमोर तो हसतमुख असतो. त्याचं जीवन म्हणजे जीवनातील विरोधाभासाचं प्रतीक आहे—जेव्हा आपल्याला हसावं लागतं तेव्हा मनात दुःख असतं, आणि दुःखी असताना बाहेरून आनंदी दाखवावं लागतं.


कल्याणीचं दुःख तिच्या वैयक्तिक जीवनातील भावनिक संघर्षातून उलगडतं. ती विदूषकाच्या प्रेमात असते, पण तिचं प्रेम तिच्यासाठी त्रासदायक आणि वेदनादायक ठरतं. कल्याणीचं जीवन तिच्या हृदयातील भावनांच्या आणि समाजाच्या अपेक्षांच्या संघर्षात अडकलेलं असतं. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचं निसर्गसुलभ सौंदर्य आणि कोमलता असली, तरी ती आतून खूप एकटी आणि वेदनेत असते.

विदूषकाच्या पात्रासारखंच, कल्याणीचं दुःख देखील बाहेरून तितकं स्पष्ट दिसत नाही. ती स्वतःच्या भावनांना दाबून ठेवते आणि समाजाच्या दबावाखाली आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याचा प्रयत्न करते. तिचं दुःख म्हणजे प्रेमाच्या त्यागात असलेली वेदना, जी संपूर्ण नाटकभर तिच्या वागणुकीत आणि संवादात प्रतिबिंबित होते.
शेवटी, कल्याणीच्या पात्राद्वारे शिरवाडकरांनी मानवी भावना, त्याग, आणि प्रेमाच्या गुंतागुंतीचा गहन शोध घेतला आहे. तिच्या दुःखात विदूषकासारखाच विरोधाभास आहे—ती प्रेम करते, पण त्या प्रेमाचं फळ मिळत नाही; ती जगात आहे, पण तिला आतून रिकामपणाची जाणीव होते.
सहकलावंत पूजा कळमकर, तंत्रज्ञ बालाजी दमुके आणि अनिकेत शेंडे सारखी उत्कृष्ट टीम सोबत असेल  सादरीकरण किती सहज-सुंदर होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे "द्विगत.
 गोदाई महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या द्विगत नाट्यप्रयोगाचे उद्घाटन अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जेष्ठ रंगकर्मी डॉ नाथा चितळे, डॉ उमेश भालेराव, डॉ .अनुराधा पत्की, दिनेश कवडे, रंगकर्मी किशोर पुराणिक, नाट्य लेखक प्रा. रविशंकर झिंगरे, विजय करभाजन, संयोजन समितीचे प्रमुख राजेश महाराज देगलूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीष देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चौधरी यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या