अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न; नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ०४ आणि परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज, ७ ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयीन 'कै. राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात' विशेष निवडणूक सभा पार पडली. विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात संपन्न झाली.
या दोन्ही समिती सभापती पदासाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. निर्धारित वेळेत आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली:
* प्रभाग समिती क्र. ०४: या समितीच्या सभापती पदासाठी सौ. पिरजादे शिरीन जैनुल यांचे दोन वैध अर्ज प्राप्त झाले होते. अन्य कोणतीही उमेदवारी अर्ज न आल्याने पिठासीन अधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी सौ. पिरजादे शिरीन जैनुल यांची प्रभाग समिती क्र. ०४ च्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. त्यांच्या नावाचे सूचक म्हणून श्री. बागवान मैनुद्दीन शमशुद्दीन आणि अनुमोदक म्हणून श्री. आवटी संदिप सुरेश यांनी स्वाक्षरी केली होती.
* परिवहन समिती: परिवहन समितीच्या सभापती पदासाठी श्री. प्रकाश रमेश पाटील यांचेही दोन वैध अर्ज प्राप्त झाले होते. एकाच उमेदवाराचे अर्ज आल्यामुळे पिठासीन अधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी श्री. प्रकाश रमेश पाटील यांची परिवहन समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या नावाचे सूचक म्हणून सौ. साक्षी राजेंद्र बोरगावे आणि अनुमोदक म्हणून श्री. संजय नारायण यमगर यांनी स्वाक्षरी केली आहे .
पीएम-ई बस सेवा (PM-eBus Sewa) आणि परिवहन समितीची पार्श्वभूमी:
केंद्र शासनाच्या 'पीएम-ई बस सेवा' योजनेअंतर्गत सांगली शहरासाठी ५० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि स्वतंत्र परिवहन सेवा सुरळीत चालवण्यासाठी महानगरपालिकेने यापूर्वीच १३ सदस्यांची परिवहन समिती गठीत केली आहे. यामध्ये स्थायी समितीचे सभापती श्री. अतुल दत्तात्रय माने (पदसिद्ध सदस्य) यांच्यासह श्री. प्रकाश रमेश पाटील, श्री. संजय नारायण यमगर, सौ. अपर्णा विवेक शेटे, सौ. अनिता हणमंत पवार, सौ. वर्षा भूपाल सरगर, श्री. गणेश शिवाजी माळी, सौ. साक्षी राजेंद्र बोरगावे, सौ. प्रार्थना अमित शिंदे, श्री. अजम महंमद काझी, श्री. संजय नायकू मेंढे, श्री. राजेश विठ्ठल नाईक आणि सौ. सलमा इरफान शिकलगार यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सभापती श्री. प्रकाश रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही परिवहन समिती शहरात पर्यावरणपूरक ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
निवड जाहीर झाल्यानंतर दोन्ही नवनिर्वाचित सभापतींचे महापालिका प्रशासन , अधिकारी, वॉर्डातील नागरिक आणि महानगरपालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या निवडीमुळे सांगलीच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.