नांदेड:-मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 05 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मार्कंडेय येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून साठा करण्यात येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक चिंचोलकर, नांदेड ग्रामिण यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 829/2026 अन्वये कलम 303 (2) बीएनएस तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 (7), 48(8) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी अंदाजे ₹32,25,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये – 1) अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात आलेली दोन इंजिने (सुमारे ₹6 लाख), 2) गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशासाठी वापरण्यात आलेल्या 40 तराफे व प्रत्येक तराफ्यांवरील 2 ब्रासप्रमाणे अंदाजे 80 ब्रास वाळू (सुमारे ₹24 लाख), 3) नदीघाटावर साठवून ठेवलेली 45 ब्रास वाळू (सुमारे ₹2.25 लाख) यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन करीत असून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक/व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार कानगुले, भिसे, तेलंग, जमीर, टिपरसे लोखंडे सर्व नेमणुक नांदेड ग्रामिण पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.