नांदेड : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून नावारूपास आलेले दैनिक सत्यप्रभाचे यंदाचे कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी प्रथमच डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्काराचा समावेश करण्यात आला असून, लोकमत समूहाचे एडिटर-इन-चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा त्याचे पहिले मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर, छत्रपती संभाजीनगर येथील स्नेहसावलीचे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर, विमान क्षेत्रात गगनभरारी घेणारे मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे व महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी निश्चित करण्यासाठी दैनिक सत्यप्रभाचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर, प्रख्यात वैद्यकतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, वरिष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी व राजेश निस्ताने आणि उद्योजक सुमित मोरगे यांचाही समावेश होता. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात उठावदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना मागील २२ वर्षांपासून या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांच्या यापूर्वी मानकऱ्यांमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ, साहित्यिक फ. मु. शिंदे, रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, डॉ. तात्यासाहेब लहाने, श्रीमती कुसुमताई रसाळ, नागनाथ फटाले, शैलाताई लोहिया, क्रिकेटपटू संजय बांगर, अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे, नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. विठ्ठल लहाने ,सकाळ समूहाचे संपादक डॉ निलेश खरे,नाट्य व चित्रपट दिग्दर्शक वामन केंद्रे,अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर,सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार,डॉ.विपिन इटणकर आदींचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.