नांदेड:-नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना होणारे अतिक्रमण तसेच अवैधरित्या पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मा. श्री. नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेकडून विशेष अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक नियमन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दि. 06 जुलै 2026 रोजी श्री. मारोती मुंडे पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन - छत्रपती शिवाजी महाराज चौक वजिराबाद चौक तिरंगा चौक गोवर्धन घाट ब्रिज परिसरातील मुख्य मार्गांवर विशेष कारवाई करण्यात आली. --
या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच 01 RCP पथक तसेच महानगर पालिका नांदेड यांचे पथक सहभागी होते. कारवाई दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली तसेच रस्त्यावर हातगाड्या, फळ विक्रेते, टपऱ्या व इतर अडथळे दूर करण्यात आले. याशिवाय चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नांदेड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे अतिक्रमण अथवा वाहन पार्किंग करू नये. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.