सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या सामान्य घरातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीचे आधुनिक शिक्षण मिळावे, ही 'लोकहित मंच'ची भूमिका आहे. त्या अनुषंगाने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी केवळ बाह्य रंगरंगोटीवर भर न देता, खालील मूलभूत सुविधांसह शाळांचे 'स्मार्ट आणि मॉडेल स्कूल' मध्ये रूपांतर करावे, ही विनंती:
डिजिटल क्लासरूम्स: प्रत्येक शाळेत अत्याधुनिक डिजिटल वर्गखोल्यांची उभारणी करावी.
आरोग्य व स्वच्छता: मुला-मुलींसाठी स्वतंत्र, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी.
BALA Concept (बोलक्या भिंती): भिंतींवरील चित्रकला आणि माहितीच्या माध्यमातून शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक वातावरण निर्माण करावे.
प्रगत प्रयोगशाळा व क्रीडांगण: विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी विज्ञान प्रयोगशाळांचे सक्षमीकरण आणि क्रीडांगणांचा विकास व्हावा.
सुरक्षा व्यवस्था: सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.
महानगरपालिकेच्या शाळा गुणवत्तेच्या बाबतीत खाजगी शाळांना मागे टाकतील, असा विश्वास निर्माण होण्यासाठी आपण या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी.
आपला नम्र,
(मनोज भिसे)
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली