पश्चिम महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाकडून अन्याय, विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/09/2026 3:39 PM

मिरज जंक्शनच्या विकासाला गती देण्यासह सह्याद्री एक्स्प्रेसचा विस्तार, कोल्हापूर–कलबुर्गी सुपरफास्टसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

मिरज, दि. १९ सप्टेंबर २०२६ : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा तसेच परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन व रेल्वे कृती समिती सांगली-मिरज यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेऊन कार्यवाही न झाल्यास आंदोलन, उपोषण व इतर संविधानिक मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मिरज जंक्शनच्या विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मिरज स्थानकाचा विकास यापूर्वी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या (RLDA) माध्यमातून प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर या कामाचा समावेश ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत करण्यात आला. मात्र, या विकासकामाला अपेक्षित गती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मिरज स्थानकावर एस्कलेटर, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, प्रतीक्षालय तसेच इतर आवश्यक प्रवासी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सध्या स्थानकाच्या इमारतीतून तसेच प्लॅटफॉर्मच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मिरज जंक्शनच्या विकासकामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याची मागणी

कोल्हापूर–पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. मुंबईतील प्लॅटफॉर्म उपलब्धतेचे कारण देत या मागणीला विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

सह्याद्री एक्स्प्रेसला मुंबईपर्यंत विस्तार देणे शक्य नसल्यास पनवेल किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) पर्यंत विस्तार देण्याचा पर्याय स्वीकारावा. तसेच पर्यायी मार्गाने कल्याण–वसई रोडमार्गे उधनापर्यंत या गाडीचा विस्तार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कोल्हापूर–कलबुर्गी सकाळची सुपरफास्ट सेवा नियमित करण्याची मागणी

पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कोल्हापूर–कलबुर्गी सकाळच्या सत्रातील सुपरफास्ट एक्स्प्रेस नियमित स्वरूपात सुरू करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

मागील वर्षी आषाढी वारीनंतर ही सेवा दोन महिन्यांसाठी विशेष गाडी म्हणून सुरू करण्यात आली होती. मात्र, गाडीच्या योग्य नियोजनाअभावी ती वारंवार चार ते पाच तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याचे कारण पुढे करून ही सेवा अपेक्षित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बंद करण्यात आली, असा दावा करण्यात आला.

गाडीला प्रतिसाद मिळाला नाही यापेक्षा ती वेळेवर चालविण्यासाठी योग्य नियोजन न होणे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे नमूद करण्यात आले. ही गाडी वेळेवर व नियमितपणे चालविली असती तर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असता, असेही सांगण्यात आले.

आजही कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरुंदवाड, सोलापूर तसेच कर्नाटकातील कलबुर्गी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांकडून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर–कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसची मागणी होत असल्याने ही सेवा नियमित स्वरूपात सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

घोषित रेल्वे सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी

रेल्वे प्रशासनाकडून यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या, मात्र प्रत्यक्षात सुरू न झालेल्या रेल्वे सेवांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

मिरज–जयनगर विशेष रेल्वेची घोषणा २०२४-२५च्या वेळापत्रकात करण्यात आली होती; मात्र ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे कोल्हापूर–गुवाहाटी रेल्वेसेवाही सुरू करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

कोल्हापूरहून कटिहारसाठी सणासुदीच्या काळात चालविण्यात आलेल्या विशेष गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत ही सेवा पुढेही सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे सेवांची मागणी

पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे—

* कोल्हापूर–मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसचा पनवेल किंवा एलटीटीपर्यंत विस्तार.
* कल्याण–वसई रोडमार्गे उधनापर्यंत सह्याद्री एक्स्प्रेसचा विस्तार.
* कोल्हापूर–कलबुर्गी सकाळची सुपरफास्ट रेल्वे सेवा नियमित सुरू करणे.
* कोल्हापूर–कटिहार रेल्वे सेवा सुरू करणे.
* मिरज–जयनगर रेल्वे सेवा सुरू करणे.
* मिरज–जम्मू-कटरा रेल्वे सेवा सुरू करणे.
* मिरज–हावडा रेल्वे सेवा सुरू करणे.
* मिरज–भुवनेश्वर रेल्वे सेवा सुरू करणे.

मिरज जंक्शन येथे या गाड्यांसाठी आवश्यक रेल्वे जागा उपलब्ध असून स्टेबलिंग तसेच देखभालीसाठी पिटलाइनची सुविधाही उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुणे–मिरज–हुबळी–बेंगळुरू मार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरण झाल्यामुळे या मार्गाचा अधिक प्रभावी वापर करून पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे सेवा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेल्वे गाड्यांच्या विलंबाचा प्रश्नही गंभीर

कोल्हापूर–कलबुर्गी सेवेसह इतर गाड्यांच्या वारंवार होणाऱ्या विलंबाकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. नुकत्याच मुंबई–कोल्हापूर विशेष गाडीला चार ते पाच तास विलंब झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

मुंबई सीएसएमटी, पुणे व कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांच्या आगमन-विलंबाबाबत प्रवाशांना योग्य माहिती मिळावी यासाठी उद्घोषणा व्यवस्था प्रभावी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रवासी सुविधा व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी

मिरज जंक्शनसह पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा वाढविणे, बंद अथवा कमी करण्यात आलेल्या सेवा पूर्ववत करणे, नवीन रेल्वेगाड्यांना मंजुरी देणे, स्थानकांचा विकास करणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागण्यांबाबत यापूर्वीही मध्य रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने आता या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मिरज जंक्शनच्या विकासकामांना गती देणे, प्रलंबित व घोषित रेल्वे सेवा सुरू करणे, नवीन रेल्वेगाड्यांना मंजुरी देणे, सह्याद्री एक्स्प्रेसचा विस्तार करणे, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक व नियोजन सुधारणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांमध्ये वाढ करणे याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांवर लवकरात लवकर ठोस कार्यवाही न झाल्यास रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन व रेल्वे कृती समिती सांगली-मिरज यांच्या वतीने आंदोलन, उपोषण तसेच इतर संविधानिक मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे 

यावेळी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य श्री. सुकुमार पाटील व श्री. किशोर भोरावत, तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वाय. सी. कुलकर्णी, पंडितराव कराडे (तात्या), मधुकर साळुंखे, सोपान भोरावत तसेच रेल्वे कृती समितीचे ज्ञानेश्वर पोतदार, गजानन कळ्ळोळी आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या