विघ्नहर्ता मित्र मंडळात 'प्रेम असावे तर असं' नाट्यवाचनाचा प्रयोग उत्साहात पडला पार
भगूर/प्रतिनिधी:
शहा गार्डन, विजय नगर येथील प्रसिद्ध विघ्नहर्ता गणेश मंडळात काल 'प्रेम असावे तर असं' या नाट्यवाचनाचा अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी प्रयोग पार पडला. ज्येष्ठ लेखक राजेंद्र चिंतावार लिखित या नाटकाचे सादरीकरण सुमारे तासभर चालले असून उपस्थितांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.
आजच्या कौटुंबिक व्यवस्थेवर आणि नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या या नाटकात नितीन भावसार, कल्पना सोनार आणि रचना चिंतावार यांनी विविध पात्रांचे हुबेहूब सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे नाट्यवाचनाचा हा प्रयोग रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशांत कापसे यांनी उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील घोरपडे, प्रशांत संधानशिव, सुजय करंजुले अनिल संधानशिव. यशवंत सैंदाणे, स्वप्निल आव्हाड, अरुण भालेराव ,मारुतीराव कोरडे, रवी एखंडे सम्राट गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.