नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या एकुण 5 हजार 106 कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच 2 फेब्रुवारी २०२६ रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. त्यानुसार जिल्हयातील संबंधित सर्व तहसिलदार यांना तालुक्यातील एकुण 5 हजार 106 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या (भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या. मुंबई) कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यानी मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करावीत व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक (भू-विकास बँक ) नांदेड या बँकेची दिनांक 8 मार्च 2025 रोजीच्या आदेशान्वये नोंदणी रद्य झाली असुन महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय एलडीबी 1015/प्र.क्र. 28 ( शिकाना / 7-स) दिनांक 9 नोव्हेंबर 2022 अन्वये राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाचे (जिल्हा भूविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज पुर्णतः माफ झाले आहेत.
भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या., मुंबई या बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की याबाबत आपले संबंधित सहाय्यक ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) महसूल विभागाशी समन्वय साधुन आपल्या सातबारा वरील भु-तारण बँक, भुविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या., मुंबई या नावाने असलेल्या बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी केल्याची खात्री करावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्हयातील संबंधीत तहसिलदार कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन शाहुराज हिरे परिरक्षक नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. नांदेड तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.