अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा - पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 04/02/2026 5:54 AM

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा - पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

शिर्डी, दि. ३ :- अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. दुर्गम भागातील पाड्यांवर विजेची समस्या असल्याने तेथे सौरऊर्जेवर आधारित उपाययोजना राबवाव्यात. अकोले तालुक्यातील पर्यटन विकास निधीत वाढ करावी, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम (२०२६-२०२७) प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते.

 बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी जिल्ह्याचा प्रारूप आराखडा सादर केला.
बैठकीत बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी आदिवासी पाड्यांवरील वीज पुरवठ्याची अडचण लक्षात घेता तेथे 'सोलार हायमास्ट' व 'सोलार स्ट्रीट लाईट' बसविण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी 'सोलार पंप' बसविण्यावर भर द्यावा, तसेच आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

अकोले तालुका हा निसर्गसंपन्न असून येथील पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचित केले. आदिवासी विकास विभागाच्या कामाला गती देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र उपकार्यालय सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. 

प्रकल्प अधिकारी (राजूर) यांनी आठवड्यातून किमान एक दिवस व आवश्यक कर्मचाऱ्यांनी या उपकार्यालयात उपस्थित राहून कामकाज पहावे, जेणेकरून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे लाभार्थी, लोकप्रतिनिधी व इतर शासकीय यंत्रणांना संपर्क करणे सुलभ होईल. याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मार्गदर्शन करताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एका शासकीय आश्रमशाळेचे रूपांतर 'मॉडेल स्कूल' मध्ये करण्याचे निर्देश दिले व हे मॉडेल स्कूल पालकमंत्र्यांनी दत्तक घ्यावे, अशी विनंती केली.

आदिवासी महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकता वाढवून त्यांना रोजगार मिळवून देण्यास प्राधान्य देणे, 'राणी दुर्गावती महिला सबलीकरण' योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आदिवासी व ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही 'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने'ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंत्री डॉ. उईके यांनी दिले.

#अकोले #पर्यटनविकास #आदिवासीविकास #पालकमंत्री #राधाकृष्णविखेपाटील #अहिल्यानगर #सौरऊर्जा #आदिवासीपाडे #जिल्हानियोजन #अकोलेपर्यटन #महाराष्ट्रशासन #गावविकास #सोलारपंप #आश्रमशाळा #ठक्करबाप्पाहीयोजना #शिर्डी

Share

Other News

ताज्या बातम्या