प्रति,
मा.ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील,
पालकमंत्री, सांगली जिल्हा.
विषय: एका उद्ध्वस्त होणाऱ्या पिढीचा आक्रोश... सांगलीला 'नशा' आणि 'भया'च्या विळख्यातून वाचवण्यासाठी कळकळीची विनंती.
आदरणीय दादा,
सांगली जिल्हा ही संतांची, क्रांतीकारकांची आणि सुसंस्कृत माणसांची भूमी आहे. पण आज याच सांगलीच्या गल्लीबोळांत जे चित्र दिसत आहे, ते पाहून कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे काळजात चर्र होईल. आज हा पत्राचा मसुदा केवळ 'लोकहित मंच'चा अध्यक्ष म्हणून नाही, तर एका अस्वस्थ सांगलीकर नागरिक आणि एका पालकाच्या भूमिकेतून लिहीत आहे.
दादा, आज सांगलीतील अनेक आयांच्या डोळ्यांतील पाणी सुकत नाहीये, कारण त्यांची तरुण मुले अंमली पदार्थांच्या (Drugs) नशेत आपली स्वप्ने आणि आयुष्य दोन्ही राख करत आहेत. कॉलेजला जाणारा मुलगा संध्याकाळी घरी येईल की नाही, आणि आला तर तो 'शुद्धीत' असेल का? या विवंचनेत आज इथला सामान्य बाप जगतोय.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होतात, फोटो निघतात, बातम्या येतात... पण प्रत्यक्ष जमिनीवर (Ground Level) मात्र परिस्थिती भीषण आहे. केवळ चर्चा करून किंवा गोड बोलून हा कॅन्सर बरा होणारा नाही. अंमली पदार्थांचे राक्षस आमच्या लेकरांना जिवंत मारत आहेत, आणि अशा वेळी प्रशासनाने 'कॅडबरी' वाटण्यासारखे मलम लावून हा जखमेचा इलाज होणार नाही. यासाठी आता शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.
आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे:
बापाचा धाक दाखवा: जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपण या गुन्हेगारांवर असा वचक निर्माण करावा की, नशेचा व्यापार करताना त्यांच्या काळजात धडकी भरली पाहिजे.
उद्ध्वस्त होणारी घरे वाचवा: ही केवळ आकडेवारी नाही, तर ही रक्तामासाची माणसे आहेत. प्रत्येक नशेबाज तरुणासोबत एक कुटुंब रस्त्यावर येतेय. पोलिसांना इतकी मोकळीक द्या की, त्यांनी या विषारी साखळीचा मुळासकट नायनाट करावा.
आश्वासने नकोत, कृती हवी: बैठकांचा सोपस्कार आता पुरे झाला, आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या सांगलीकरांना दिसायला हव्यात.
दादा, सांगलीकरांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. आम्हाला आमची मुले सुरक्षित हवी आहेत, आम्हाला आमची सांगली पुन्हा 'भयमुक्त' हवी आहे. प्रशासनाच्या कागदी घोोड्यांपेक्षा तुमच्या एका कठोर निर्णयाची आज जिल्ह्याला गरज आहे.
उद्याची पिढी नशेच्या अंधारात हरवण्यापूर्वी आपण धावून याल, हीच माफक अपेक्षा.
आपला नम्र,
(मनोज भिसे)
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.
एक अस्वस्थ सांगलीकर.