नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील निवासी मालमत्तेवरील ४ मालमत्ता धारकांचे नळ व ड्रेनेज कनेक्शन बंद केले तर ६ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे *आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या निर्देशानुसार *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* आणि *उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
वारंवार सूचना, नोटिसा देऊनही काही थकबाकीदारांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेत दि.०४.०२.२०२६ रोजी शिवाजी नगर या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत *मालमत्ता धारक अनिल गोविंदराव पुयड, रंजना प्रकाश वाघमारे, रहमतबी जानिमिया व प्रल्हाद भालेराव* यांच्याकडे एकत्रितपणे रु.२.८८ लक्ष कर थकीत असल्याने या मालमत्ताधारकांचे नळ व ड्रेनेज कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतवारा क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत *अब्दुल वकील अ.हाजी,अ.हाजी अ.खवी, शेख बशीर, शे.मो.अफरोद्यीन शे.दादे, मुसा बेग खाजा बेग व चांदबी शेख ऊमर* यांच्याकडे एकत्रितपणे रु.९.१२ लक्ष एवढी थकबाकी असल्याने त्यांची एकुण ६ मालमत्ता सील करुन जप्त करण्यात आलेली असून कोणतीही सूट किंवा तडजोड न करता थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
*नागरीकांनी सहकार्य करुन जप्ती टाळावी*
मालमत्ता कर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात असून थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती कारवाई टाळता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन *महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या वतीने करण्यात येत आहे.