डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड संवर्गातील 86 पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/12/2025 8:22 PM

नांदेड  :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या संस्थेमध्ये वर्ग- ४ (गट-ड) संवर्गातील विविध २१ संवर्गांतील एकूण ८६ पदांच्या पदभरती परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, तांत्रिक तपासणी व सर्व संबंधित निकषांचा विचार करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सदर अंतिम गुणवत्ता यादी सोमवार १५ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या https://www.drscgmcnanded.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित सर्व उमेदवारांनी अंतिम गुणवत्ता यादी या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी व पुढील निवड प्रक्रियेबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांनी केले आहे.

या पदभरतीची २४ एप्रिल २०२५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस राज्यभरातून सुमारे 16 हजार 972 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, या पदभरती प्रक्रियेस उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता.

सदर पदभरती प्रक्रियेअंतर्गत पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा दिनांक २५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध अधिकृत परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षा प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निर्भीड व सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व सी.सी.टी.व्ही. जॅमर बसविण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली.

या पदभरतीमुळे महाविद्यालय तसेच रुग्णालयातील मनुष्यबळात वाढ होणार असून, दैनंदिन प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम होईल तसेच रुग्णसेवेला अधिक गती, गुणवत्ता व कार्यक्षमता मिळण्यास मोठा फायदा होणार आहे, असेही संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या