काल सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकात झालेल्या दुर्दैवी अपघातातील कैलासवासी शितल आमरे या महिला भगिनींच्या मृत्यूनंतर आज आम्ही कोल्हापूर रोड सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने सांगली राजवाडा येथील सार्वजनिक बांधकामाच्या विभागीय कार्यालयासमोर तिरडी मोर्चा आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या दोन्हीच्या गलथान कारभारामुळे आणि बेजबाबदार व्यवस्थेमुळे काल झालेला अपघाती बळी हा अपघातातील बळी नसून तो या प्रशासनाच्या अवस्थेने घेतलेला बळी आहे तो या प्रशासनाने केलेला खून आहे. आणि प्रशासनाच्या या अशा गलथान बेशिस्त बेजबाबदार कारभार विरोधात आज सांगली राजवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर असून नसल्यासारखे असलेल्या अमृत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची अंत्ययात्रा तिरडी सजवून काढण्यात आली. या ठिकाणी मंजूर असलेला सांगली कोल्हापूर रोड केवळ आणि केवळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोहोत नसलेल्या समन्वयामुळे रखडला आहे. यामध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत महानगरपालिका व बांधकाम विभाग यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यासहित एक संयुक्त बैठक बोलवावी जेणेकरून या रस्त्या संदर्भात असणारे प्रश्न त्यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण मार्किंग, रस्त्यातील पोल शिफ्टिंग, रस्त्यातील पाणीपुरवठा लाईन्स, रस्त्यातील ड्रेनेज लाईन्स, रस्त्यातील असणारे अतिक्रमण, रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी गटाराची आवश्यकता या आणि अशा बाबींसाठी एकत्रित येऊन समन्वयाने लवकरात लवकर मार्ग काढून सदर रस्त्याची पूर्ण क्षमतेने सुधारणा करण्यात यावी, त्यासाठीच काम ताबडतोब सुरू करावे, सोबतच आता आजच्या आज कमीत कमी या रस्त्याचे पॅचवर्क लगेच सुरु करावे, आणि काल अपघाती मृत्यू झालेल्या दुर्दैवी कैलासवासी शितल आमरे या महिला भगिनीस आणि त्यांच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देऊन न्याय देण्यात यावा या अशा मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तिरडी बांधण्यात आली. संपूर्णपणे झोपलेल्या आणि मृत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांना आता तरी किमान सात बळी गेल्यानंतर जाग यायला हवी आणि अशा मृत्यूंचे नैतिक जबाबदारी स्वीकारून या रस्त्याची पूर्ण क्षमतेने सुधारणा करावी, अन्यथा गेंड्याची कातडी असलेल्या या संपूर्ण प्रशासनाला जाग आणण्यासाठी या आंदोलनाला पुढील टप्प्यावरती निश्चित घेऊन जाण्यात येईल, आणि याला जबाबदार केवळ आणि केवळ जिल्हा प्रशासन असेल असा इशारा या ठिकाणी सर्व पक्ष कृती समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी सतीश साखळकर माजी नगरसेवक अभिजीत भोसले रजाक नाईक संदीप दळवी अजीज शेख रोहित जगदाळे सुमित शिंदे आनंद देसाई शंभूराज काटकर अमर सम्राट धनंजय वाघ विद्याधर कुलकर्णी प्रशांत भोसले राहुल पाटील या सह या परिसरातील नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सदर आंदोलनाची दखल घेऊन लागलीच जागेवर उप अभियंता निखिल पाटील आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यकारी अभियंता श्री कुरणे यांनी उद्या सकाळी 11 वाजता संबंधित रस्त्याच्या मार्किंग चे काम आणि त्यानुसार पाईपलाईन ची कामे सुरू करण्यात येतील अशी अश्वस्त केले, त्यासोबत आजच या रस्त्याचे मुरमांनी पॅचवर्क काम सुरु करण्यात आले आहे. ही समाधानाची बाब आहे. परंतु प्रत्येक वेळेस बळी गेल्यानंतर जाग येणार का अजून देखील जाग येणार नसेल तर या आंदोलनाला पुढच्या पातळीवर घेऊन जाऊन प्रशासनाला निश्चितच जाब विचारला जाईल अशी माहिती बोलताना माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांनी दिली.