किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृतीसाठी ज्ञान प्रबोधिनी देणार जिल्हयातील शिक्षकांना प्रशिक्षण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2025 5:35 PM



- प्रबोधनाचे मॉड्युल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- नोव्हेंबर महिन्यातील चार रविवारी चालणार प्रशिक्षण सत्र

 सांगली, दि. १५
जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दिवाळीनंतर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन विविध विषय हाताळणारे प्रबोधनाचे सर्वसमावेशक मॉड्युल राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे, याचे पूर्वनियोजन काटेकोर करून हे मॉड्युल यशस्वी करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

 यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या प्रतिनिधी डॉ. अनघा लवळेकर, उपक्रम समन्वयक अश्विनी देशपांडे, मुख्य प्रशिक्षक दीपाली शेंडे आदि उपस्थित होते.

 सांगली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू करून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यात आली आहे. यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीतून काम सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रबोधनाच्या पुढील टप्प्यात ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या माध्यमातून आठवी ते दहावीतील किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मॉड्युल राबवण्यात येणार आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
 पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व खाजगी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आठवडाभरात सर्व मुख्याध्यापकांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांना पीपीटीद्वारे याबाबत माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात शनिवारी दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत पहिल्या तासात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. 

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, हे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करावे, शिक्षकांनी प्रबोधन करताना दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच, मराठीसह इंग्रजी, उर्दु, कन्नड माध्यमाच्या शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संचालक डॉ. अनघा लवळेकर म्हणाल्या, ज्ञानप्रबोधिनीचे 20 हून अधिक प्रशिक्षक एका वेळी 4 आठवड्यात शिक्षकांना प्रशिक्षण देतील. या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन प्रत्येक आठवड्याला सहा तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थानिक स्तरावर समन्वयक नेमण्यात येईल. तीन महिन्यांनंतर त्याचा शास्त्रीयदृष्ट्या ट्रॅकिंग केले जाईल. 

 समन्वयक अश्विनी देशपांडे आणि प्रशिक्षक दीपा शेंडे यांनी या सर्वसमावेशक मॉड्युलबद्दल सादरीकरण केले.


Share

Other News

ताज्या बातम्या