इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे की आयकर विभागानं ITR दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून 30 सप्टेंबर 2025 केली आहे. अनेकांनी ही माहिती खरी मानून पुढेही शेअर केली. मात्र आयकर विभागानं याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे की हा मेसेज खोटा आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आहेत. आयकर विभागाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 हीच आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही.
भारतीय प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार काही विशिष्ट उत्पन्नावर कर भरावा लागतो. यामध्ये पगार, घरभाडे, व्यावसायिक नफा, व्याज, लाभांश किंवा मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारा नफा यांचा समावेश असतो. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन कर रचना जाहीर करण्यात आली असून त्यानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.
करदात्यांना मदत करण्यासाठी कायद्यात अनेक कर सवलती आणि वजावटी दिल्या आहेत. उदाहरणार्थ, कलम 80C अंतर्गत प्रॉव्हिडंट फंड (PF), आयुर्विमा किंवा ईएलएसएस (ELSS) सारख्या योजनांमध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. त्याचप्रमाणे कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यावर आणि कलम 80E अंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजावरही कर वजावट मिळू शकते.